
(फोटो -तोडणी अभावी शेतात उभा असलेला२६५ जातीचा ऊस.)
संघर्ष नायक वृत्तसेवा बीड (ता.२२)
साखर आयुक्तांचा आदेश आणि सक्त ताकीद असताना देखील मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने फुले २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेत नाहीत किंवा तो ऊस घ्यायलाही टाळाटाळ करतात, साखर सम्राटांना २६५ जातीच्या ऊसाचे वावडे आहे का ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांनी केला आहे.एस.एम.देशमुख यांनी साखर आयुक्तांना एक पत्र पाठवून साखर कारखान्यांच्या अरेरावी कडे आणि त्यांच्या आदेशाला कशी केराची टोपली दाखवली जातेय या वास्तवाकडे साखर आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
साखर कारखाने २६५ जातीचा ऊस का घेत नाहीत? या क्षेत्रातील काही जाणकारांशी चर्चा केली असता साखरेचा उतारा कमी येतो,असा अनेक कारखानदारांचा गैर समज असल्याचं सांगणयात आलं.मात्र डिसेंबर-जानेवारीत म्हणजे योग्य वेळी ऊस तोड झाली तर उतारा १४.४० टक्कयापर्यत येतो असंही हे जाणकार सांगतात.म्हणजे कारखानदार चुकीचा अर्थ काढून शेतकरयांची अडवणूक करीत आहेत असा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे.
सण २००७ मध्ये वसंतदादा शूगर इन्स्टिटय़ूट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी फुले २६५ हा ऊसाचा वाण विकसित केला.तेव्हाच या जातीची सर्व हंगामासाठी शिफारस केली गेली होती.२००९ मध्ये अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था लखनऊ (आयआयएसआर) यांनीही गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांसाठी २६५ या वाणाची शिफारस केलेली आहे.महाराष्ट्रात ३२ टक्के क्षेत्रावर ही जात लावली जाते.पश्चिम महाराष्ट्रात काही अडचण नाही पण मराठवाड्यातील कारखानदार शेतकरयांची अडवणूक करताना दिसतात.ही वस्तुस्थिती देशमुख यांनी आपल्या पत्रात विषद केली आहे.
शेतकरयांसाठी हा ऊस फायद्याचा आहे.ऊस वजणदार भरतो, सरळ वाढ होत असल्याने तोड सोपी होते.एकरी उत्पादन अन्य जातीच्या तुलनेत जास्त होते.खोडकिड, शेंडेकिड, लोकरीमावा, कांडीकिड या रोगांचा प्रादुर्भाव या वाणावर तुलनेत कमी होतो.कमी पाण्यात जास्त उत्पादन होत असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी या वाणासाठी जास्त आग्रही असतात.महत्वाचे म्हणजे या जातीच्या ऊसाला रानडुकरांचा उपद्रव नसतो.मात्र कारखानदार गैरसमजातून नोंदी घेत नाहीत आणि ऊस गाळपासाठी घेण्यासाठी देखील तयार नसतात असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालकांनी नुकतेच एक परिपत्रक काढून २६५ जातीच्या नोंदी घेण्याच्या सूचना नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिल्या आहेत.नोंदी घेतल्या नाही तर तक्रारी करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत,मात्र अशा तक्रारी देऊन साखर कारखान्याशी पंगा घ्यायला कोणताही शेतकरी तयार नसतो.त्यामुळं साखर आयुक्तांनीच २६५ जातीच्या वाणाची किती नोंद झाली याची माहिती प्रत्येक कारखानयाकडून घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली तरच हा तिढा सुटेल असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
२६५ जातीचा ऊस शेतकरयांसाठी किफायतशीर आहे, अन शेतकरयांनी आपल्या शेतात कुठला ऊस लावला पाहिजे हे त्याला ठरवू द्या, कारखाने शेतकरयांना खड्ड्यात घालून स्वता:च्या लाभ – तोट्याचा विचार करणार असतील तर ते सर्वथा गैर आहे.साखर आयुक्तांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा कारण आता ऊस लागवड आणि तोडीचा हंगाम जोरात सुरू आहे असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे..




Discussion about this post