
मानवी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गटविकास अधिकारी दौंड यांना निवेदन देताना
संघर्षनायक वृत्तसेवा पारगाव (दि.०४)
मध्यंतरीच्या पावसाने दौंड तालुक्यातील पारगाव फाटा येथील रहिवासी घरे व व्यवसायिकांच्या दुकानात दोन वेळा पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने मानवी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गटविकास अधिकारी दौंड यांना या बाबत निवेदन देण्यात आले.
पारगाव फाटा या ठिकाणी रस्त्याचे काम करीत असताना संबंधित ठेकेदाराने पावसाचे पाणी वाहून जाण्याचे जुने स्रोत व त्यावरील जुन्या मोऱ्या बंद केल्याने तेथील नागरिकांना पावसाच्या पाण्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी असणाऱ्या मोऱ्या या इंग्रज काळापासून अस्तित्वात होत्या. ठेकेदाराने रस्त्यालगत बनवलेल्या गटर लाईन या निकृष्ट दर्जाच्या केल्या असून त्या बनविताना कुठल्याही प्रकारची लेव्हल अथवा चढ-उतार तपासण्यात आलेला नाही. पावसाच्या पाण्याचे हे बंदिस्त गटार नदीपर्यंत सोडणे गरजेचे असताना ठेकेदाराने अर्धवटच काम केलेले आहे. या कडे ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप या निवेदनात केला गेला आहे. या वेळी मानवी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, पारगाव सोसायटी चे संचालक चंद्रकांत शिशुपाल, जेष्ठ नागरिक रामचंद्र टिळेकर हे उपस्थित होते.
तसेच या बाबत कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असल्याचा इशारा जेष्ठ नागरिक संघांचे रामचंद्र टिळेकर यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत पारगाव ने या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व पुणे यांना पत्र व्यवहार केलास असून ग्रामस्थांना होणाऱ्या गैरसोई बद्दल तातडीने उपाय योजना करण्याची विनंती केली आहे.
पारगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांनी निवेदन घेताना साधे खुर्चीतून उठण्याची औपचारिकता सुद्धा दाखविली नसल्याचा आरोप जेष्ठ नागरिक सेवा संघांचे रामचंद्र टिळेकर व मानवीहक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय आल्हाट यांनी केला आहे. या बाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे असल्याचे ही त्यांनी सांगितले.
Discussion about this post