दारूबंदी असताना कोण करते दारूविक्री ? नागरिक संतप्त…

पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१९)
सुमारे ३० वर्षापासून दारूबंदीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या पारगाव (ता.दौंड) मध्ये मुख्य चौकाच्या कडेला दारू रिचवून टाकलेल्या मोकळ्या प्लास्टिक पिशव्याचा (फुगे ) खच पडत असल्याने यावर पारगावचे नागरिक संतप्त झाले असून दारूबंदी असताना नक्की दारूविक्री कोण करते असा संतप्त सवाल आता पारगावकर करताना दिसत आहेत.
पारगाव हे तालुक्यातील एक मोठे गांव असून ३० वर्षांपूर्वी स्व.आबासाहेब करमरकर,वसुधा सरदार व काही ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी उभे केलेल्या चळवळीमुळे आजतागाईत गावात दारू वाईन्स किंवा परमिट रूमची दुकाने निर्माण झाली नाहीत किंवा त्यासाठी परवानगी दिली जात नसल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात दारूबंदीबाबत पारगावचे नाव हे अग्रस्थानी आहे.
परंतु हल्ली तरुण मुले ही गावात मिळणाऱ्या दारूच्या आहारी जात असल्याने गावात अशांततेचे वातावरण तयार होत आहे.याचे रूपांतर छोट्या मोठ्या वादविवादामध्ये होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पारगाव मध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमीन असल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण हि मोठ्या प्रमाणात आहे.त्याचाच फायदा या दारू विक्रेत्यांनी घेतला असून अनेक दिवसापासून या ठिकाणी हि अनधिकृत दारू विक्री होत आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा हे व्यवसाय मोडले आहेत.परंतु ते कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा चालू होत आहेत.याचा शोध पोलीस खात्याने घेणे जरुरीचे आहे. गावातच दारू मिळत असल्याने गावात भांडण तंटे वाढले आहेत.एका सुज्ञ नागरिकाने याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर गावातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असल्याचे समजते.
संयुक्तीत कारवाईची ग्रामस्थांची मागणी. पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तिक कारवाई करणे गरजेचे असून या गावात सुरु असलेली अनधिकृत दारू विक्री तातडीने बंद करावी, व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
अन्यथा दारूबंदीसाठी पुन्हा जनआंदोलन उभे राहिल. या गावात ३० वर्षाहून अधिक काळ दारूबंदी झालेली असल्याने या गावाचे जिल्हाभर दारूबंदीसाठी नावलौकिक मिळाले आहे.यालाच काही दारू विक्री करणाऱ्याकडून गालबोट लावून गावाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जर या दारू विक्री करणाऱ्यावर प्रशासनाकडून कारवाई झाली नाही तर भविष्यात पुन्हा एकदा दारूबंदीसाठी जनआंदोलन उभे राहू शकते असे मत येथील सुज्ञ आणि जेष्ठ नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे वेळीच यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माफक मागणी समस्त पारगावचे नागरिक करू लागले आहेत.




Discussion about this post