कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे…..

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे…..
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)
“उष :काल होता होता काळ रात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “…
अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्यातील अखिल भारतीय पातळीवरचे अग्रक्रमी उदाहरण आहे.
‘जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा
घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची…
असे म्हणणारे सुरेश भट कविते मधल्या ‘गझल’ या काव्यप्रकारासाठी जन्मभर झिजत राहिले. स्वतः लिहीत असतानाच शेकडो कवींना त्यांनी लिहिते केले .मराठी कवितेच्या इतिहासात सुरेश भट हा असा इतिहास पुरुष आहे.म्हणूनच त्यांचा स्मृतिदिन हा एका अर्थाने मराठी गझल दिन म्हंटला पाहिजे.
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
असे अभिमानाने म्हणणारे सुरेश भट हे फक्त कवितेसाठी जगणारे, दिवसाचे चोवीस तास कवितेच्या कैफात धुंद राहणारे आणि भूत काळाचा साकल्याने, वर्तमानाचा विवेकाने आणि भविष्याचा व्यापक तेने विचार करणारे द्रष्टे महाकवी होते.
“पुसतात जात मुदडे मसणात एकमेकांना ,
कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला ?
असा विदारक ,दाहक अनुभव मांडणारे सुरेश भट मानवी मनोव्यापारांचे चित्रण अतिशय प्रभावी पद्धतीने करत असत. त्यांच्याइतके प्रखर सामाजिक भान असलेला कवी फार विरळा असतो. म्हणून तर त्यांच्या कवितांवर, गीतांवर गझलांवर तमाम महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले . त्यातूनच
मी साळसूद सुर्याशी केले न कधी तहनामे ,
मी लाख लाख लोकांच्या हृदयात प्रकाशत होतो “..
असा अदम्य विश्वास त्यांना प्राप्त झाला होता.सुरेश भटांनी माणसांवर नितांत प्रेम केले .’कोणत्याही जातीय दंगलीत पक्षी मारले जात नाहीत, झाडे कापली जात नाहीत ,मारली व कापली जातात ती माणसे ‘असे म्हणणाऱ्या सुरेश भटांना मानवतेची जपणूक करणारी कविता अतिशय जवळची वाटत असे.किंबहुना तीच कविता त्यांनी लिहिली.वयाच्या अठराव्या वर्षापासून म्हणजेच १९५० च्या आसपास सुरेश भटांनी कविता लिहायला सुरुवात केली.१९६३-६४ पासून त्यांनी गझल लेखनाला सुरुवात केली.
मराठीतील सर्व संत साहित्य,केशवसुत ,तांबे ,कुसुमाग्रज यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. उर्दू गझलेतील मिर्झा गालिब, इक्बाल, जिगर मुरादाबादी ,फैज अहमद फैज ,नासिम काजमी,कतील शिफाई, अहमद फराज हे त्यांचे आवडते शायर होते. सुरेश भट म्हणायचे की,या कवींकडून मी दोन गोष्टी शिकलो,’ एक म्हणजे कमीतकमी शब्दातून जास्तीत जास्त आशय उत्कटपणे प्रकट करणे. दुसरे म्हणजे एकही अनावश्यक शब्द न वापरणे.’शब्दांची इज्जत करणे व ते करीत असताना गझलेचा नखरा सांभाळणे त्यांना महत्त्वाचे वाटत असे. शब्दांसाठी मी नाही तर माझ्यासाठी शब्द आहेत ही त्यांची ठाम भूमिका होती.हे ध्यानात घेणे फार महत्वाचे आहे.
सुरेश भट यांना बालवयातच पोलिओ झाल्याने ते एका पायाने अपंग होते.आपल्या व्यंगावर मात करणाऱ्या भटांनी काही काळ शिक्षक,पत्रकार म्हणून काम केले.पण ते रमले फक्त आणि फक्त लेखनातच.भटांना संगीताची,वाद्यांची उत्तम जाण होती.तसेच अनेक भाषाही अवगत होत्या. मराठी कवितेवर आणि खास करून गझलेवर त्यांचे न फिटणारे ऋण आहे.मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती ही त्यांची त्यांच्या कवितेप्रमाणे अढळ ओळख राहणार आहे. अर्थात मातेचेच ऋण आपल्यावर आहे असे त्यांनी अनेक ठिकाणी स्पष्ट केले आहे.
गझलेच्या प्रेरणे बाबत त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे ,’ मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले ,भेटलेले, भोगलेले किंवा सोसलेले अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात तर कधी ते दिसत नाहीत. पण अवती भवती त्यांची कुजबूज चाललेली असते. कधी कधी चुकून एखादा चेहरा दिसतो ,कधीकधी स्पर्शही जाणवतो .एखाद्या वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवांचे बारकावे घेऊन येतो आणि मग शेराला, गझलेला सुरुवात होते.’
कविता आणि आयुष्य यांच्या परस्पर संबंधाबाबत सुरेश भट म्हणाले होते , ‘माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता .माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा आहे. जीवन तसे अपूर्णच असते. संपूर्णते साठी जखमा अपरिहार्य असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत ते जीवनही समृद्ध नाही .कवितेचा संबंध आयुष्याची असतोच.
” मला जाळून लोकांनी स्मशानी भाषणे केली ,
उशिरा मी म्हणे त्यांना कळया लागलो होतो …
अशी खंत या जखमांतूनच त्यांनी व्यक्त केली.अर्थात व्यक्तीपेक्षा समष्टीचा विचार भटांची कविता करते.सुरेश भटांच्या मातोश्री शांताबाई या डाव्या विचारसरणीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या .तर सुरेश भट स्वतः विद्यार्थीदशेत ‘ एस.एफ.आय. ‘या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते .सुरेश भटांची गीते शाहीर अमरशेख आपल्या कला पथकातून सादर करत असत. यावरून या द्रष्ट्या महाकवीचा वैचारिक पिंड आणि बांधिलकी अधोरेखित होते.
ज्येष्ठ समीक्षक कालवश द.भी.कुलकर्णी यांनी म्हटले होते की , ‘सुखवस्तू कुळात जन्माला आलेले सुरेश भट आयुष्यभर रमले ते अल्पशिक्षित ,गरीब ,श्रमिक वर्गात. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय समाज भेकड आणि भोंदू असतो आणि श्रमिक वर्ग शूर आणि अभ्रष्ट असतो अशी त्यांची धारणा होती. ”
“जमणारच नव्हते माझे या माझ्या चोर पिढीशी,
मी येणाऱ्या काळाची अनमोल आनामत होतो …
असे भटांनीही म्हटले आहेच.असा हा अनमोल अनामत असलेला सर्वसामान्य माणसांचा महाकवी होता. त्यांच्या निधनानंतर गेल्या वीस वर्षांमध्ये मराठी गझल ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे ,वाढत चालली आहे ही फार महत्त्वाची बाब आहे.अर्थात तिच्या सुधारण्याला भरपूर संधी आहे. मराठी गझल अजून व्यापक व्हायला हवी, सखोल व्हायला हवी, समृद्ध व्हायला हवी यात शंका नाही.त्याबाबत आपल्या कमजोऱ्या आणि मर्यादा असल्या तरी एक गोष्ट खरी आहे,
गझल विधेचा बघता बघता विशाल सागर झाला
कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे….
सुरेश पाटील उर्फ दादा यांना विनम्र अभिवादन…!