अखिल भारतीय बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीने सांगलीत तारीख अकरा व बारा मार्च रोजी देशव्यापी भव्य परिषद

अखिल भारतीय बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीने सांगलीत तारीख अकरा व बारा मार्च रोजी देशव्यापी भव्य परिषद
सांगली मराठा सेवा संघ सभागृहामध्ये ही देशव्यापी परिषद आयोजित करण्यात आलेली असून या देशव्यापी बांधकाम कामगार संघटनांच्या परिषदेचे उद्घाटन आयटक संघटनेचे अखिल भारतीय सचिव कामगार नेते कॉ सुकुमार दामले(नई दिल्ली) यांच्या हस्ते होणार आहे.
अखिल भारतीय बांधकाम कामगार फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉ विजयन कूनिसरी(केरळ) काँ के रवी अध्यक्ष (तमिळनाडू) हे सुद्धा या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. या परिषदेस सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून शुभेच्छा देणार आहेत. या परिषदेमध्ये आयटक फेडरेशनचे अतिरिक्त जनरल सेक्रेटरी कॉ प्रवीण कुमार गौडा (तेलंगणा)व महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ शाम काळे (नागपूर)हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात या परिषदेचे स्वागत समितीचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलेले आहे की, सध्या भारतामध्ये दहा कोटी पेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत. देशात शेती खालोखाल बांधकाम हा व्यवसाय असून या व्यवसायामार्फत दरवर्षी 75 हजार कोटी पेक्षा जास्त जीएसटी सरकारकडे जमा केला जातो. इतकेच नव्हे तर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी संपूर्ण देशामध्ये सध्या एक लाख 65 हजार कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र यातील 25% रक्कम सुद्धा बांधकाम कामगारांच्या कल्याणावर खर्च झालेली नाही.संघटनेची अशी अपेक्षा आहे की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळावी, बांधकाम कामगारांना विमा व वैद्यकीय सवलती देण्यात येऊन बांधकाम कामगारांची घरकुले बांधण्यात यावीत. परंतु या संदर्भात शासन प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दिसून येत नाही.
इतकेच नव्हे तर या बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्या ऐवजी भाजप सरकारने चार लेबर कोड लागू करण्याच्या नावाखाली भाजप सरकार बांधकाम कामगारांचा कायदाच रद्द करण्याचे ठरवून मूळ कायद्यातील कामगारांच्या कल्याणाचा भाग या चार लेबर कोड मध्ये वगळण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे भारत सरकारकडून बांधकाम कामगारांच्या कायद्यावर घाव घातले जात असून दुसऱ्या बाजूस असंघटित उद्योगातील हा बांधकाम कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये काम करतो दररोजच्या अपघातामध्ये अनेक बांधकाम कामगार मृत्युमुखी पडत आहेत. तरीही त्यांना किमान वेतन व सुरक्षा साधने दिली जात नाहीत. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठीच देशपातळीवर ही महत्त्वाची परिषद होत आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे व सचिव कॉ विशाल बडवे यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.