महाराष्ट्र

हरकती दाखल टप्पा यशस्वी. आता जनता व लोकप्रतिनिधी जागृति व दि. २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात वीजदरवाढ प्रस्ताव होळी – निमंत्रक समितीच्या वतीने आवाहन.

वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्य स्तरीय समन्वय समिती (ECIOCC)हरकती दाखल टप्पा यशस्वी. आता जनता व लोकप्रतिनिधी जागृति व दि. २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात वीजदरवाढ प्रस्ताव होळी – निमंत्रक समितीच्या वतीने आवाहन.
इचलकरंजी दि. १६ – महावितरणने मागणी केलेली ६७,६४४ कोटी रु. म्हणजेच सरासरी ३७% म्हणजेच सरासरी २.५५ रु. प्रति युनिट दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी व राज्यातील सध्याचेच वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर आणावेत या मागणीसाठी व या वीजदरवाढी विरोधात जनजागृती करण्यासाठी दि. २५ फेब्रुवारीपर्यंत सभा, मेळावे, बैठका, बोर्डस, बॅनर्स, हँडबिल्स, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर इ सर्व समाज माध्यमे याद्वारे प्रचार व प्रसार करण्यात येईल. त्याचबरोबर स्थानिक आमदार, खासदार व मंत्री यांची समक्ष भेट घेऊन ही दरवाढ रद्द करणे का आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घ्यावा यासाठी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह याप्रश्नी निर्णायक बैठक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यानंतर या वीजदरवाढीच्या विरोधात संपूर्ण राज्यात मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता “वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन” करण्यात येईल. यावेळी राज्यात सर्वत्र स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवर मोर्चे आयोजित करण्यात येतील. यावेळी वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल व राज्य सरकार व महावितरण यांना निवेदन देण्यात येईल. तसेच राज्यात जेथे शक्य होईल, तेथे ग्राम सभेमध्ये वीजदरवाढ विरोधी ठराव करून शासन, कंपनी व आयोगाकडे पाठविण्यात येईल. राज्यातील जागरूक वीज ग्राहक व विविध ग्राहक संघटना यांनी हा आंदोलन कार्यक्रम संपूर्ण ताकदीनिशी राबवावा” असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने निमंत्रक प्रताप होगाडे, मालेगांवचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, डॉ. एस. एल. पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी रावसाहेब तांबे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रशांत मोहोता, प्रमोद खंडागळे, सचिन चोरडिया, हेमंत कपाडिया, किरण जगताप, धनंजय बेळे, चंद्रकांत पाटील, शंकरराव ढिकले, एड यासिन मोमीन, फैजान आझमी, जयंत कड, जॉन परेरा, मुस्तकिन डिग्निटी, लव शिंदे, प्रवीण पाटील, राजीव जालान, विनित पोळ, सत्यनारायण गड्डम इ. प्रमुखांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दि. १५ फेब्रुवारी या हरकती दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ३२४६ हरकती नोंद झाल्या आहेत. याशिवाय ईमेलद्वारे अनेक हरकती गेल्या आहेत. त्या मान्य होतील असे नाही. याशिवाय अनेक ग्राहकांनी हार्ड कॉपीज् दाखल केलेल्या आहेत. त्या निश्चितच मान्य होणार आहेत. त्यामुळे एकूण हरकतींची संख्या ५००० वा अधिक होऊ शकते. मागील सुनावणीचे वेळी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये एकूण दाखल हरकती २३०० होत्या. त्याशिवाय यावेळी ई फाईलिंग व ई हीयरिंग मुळे हरकती दाखल करणे सर्वसामान्य वीजग्राहकांना अडचणीचे व गैरसोयीचे झाले होते. अशाही परिस्थितीत वाढलेले हे प्रमाण निश्चितच चांगले आहे. यावेळी विविध ग्राहक व औद्योगिक संघटना यांनी स्वतःहून मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने हरकती नोंद झाल्या आहेत. त्याबद्दल या सर्व संघटना व सर्व संबंधित ग्राहक प्रतिनिधी यांचे समन्वय समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे व आभार मानण्यात आले आहेत.

दि. २१ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणाऱ्या ई हीयरिंग मध्ये सर्व हरकतदारांनी आपले म्हणणे स्पष्टपणे व पूर्ण ताकदीने मांडणे. तसेच दि. २५ फेब्रुवारीपर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणे व दि. २८ फेब्रुवारी रोजी या वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करणे हे सर्व कार्यक्रम सर्व संघटनांनी व वीज ग्राहकांनी पूर्ण ताकदीनिशी राबवावेत असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!