महाराष्ट्र

दहावे गझल संमेलन : एक ओझरता दृष्टिक्षेप

दहावे गझल संमेलन : एक ओझरता दृष्टिक्षेप

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )

गझल सागर प्रतिष्ठान(मुंबई ) आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी(अकोला )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अकोला येथे ७ व ८जानेवारी २०२३ रोजी अतिशय दिमाखात संपन्न झाले. गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या नेतृत्वाखाली गझल सागर प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे मराठी गझल वृद्धिंगत होण्यासाठी गझल संमेलनाच्या आयोजनापासून गझल कार्यशाळेपर्यंत आणि गझल गायन मैफली पासून गझलसंग्रह प्रकाशनापर्यंत अतिशय तळमळीने आणि सातत्याने कार्य सुरू ठेवले आहे.एखाद्या काव्यप्रकाराची सलग दहा संमेलन होणे हे भारतीय भाषेतील एक ठळक वैशिष्ट्य आहे. ते मराठी गझले मध्ये सतत दहा संमेलने घेऊन गझल नवाज भीमराव पांचाळे आणि गझलसागर प्रतिष्ठान यांनी सिद्ध केले आहे. मराठी गझलेच्या इतिहासात याची सुवर्णाक्षरी नोंद करावी लागेल.

अकोल्याच्या पोलिस लॉन्स या देखण्या परिसरात कविवर्य सुरेश भट नगरी आणि मधुसूदन नानिवडेकर सभागृहात हे संमेलन दोन दिवस रंगले. या गझल संमेलनाचा प्रारंभ अशोक वाटिकेपासून संमेलन स्थळापर्यंत काढलेल्या अतिशय सुरेख गझलदिंडीने झाला. या गझल दिंडीत संमेलनाध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे, गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे, स्वागताध्यक्ष सुगत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे ,डॉ.गजानन नारे ,ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी, प्रतिमा इंगोले, सुदाम सोनुले यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. लेझीम, बँड आणि इतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही दिंडी सुरू होती या दिंडीमध्ये विविध शाळा व महाविद्यालये यांची पथके सामील झालेली होती. अतिशय उत्साही पण शिस्तबद्ध अशी ही गझलदिंडी होती.ही दिंडी अशोक वाटिका,बस स्थानक,मदनलाल धिंग्रा चौक,गांधी मार्ग, महापालिका चौक या मार्गे पोलीस लॉनवर आली.

याबद्दल संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे (विभागीय आयुक्त) हे होते .तर उद्घाटक जेष्ठ कवी, अभिनेते,दिग्दर्शक नागराज मंजुळे होते. प्रमोद भोसले (राज्य कर आयुक्त ,मुंबई )हे विशेष निमंत्रित होते. तर स्वागताध्यक्ष तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे होते. या सत्रात विद्यानंद हाडके यांच्या ‘ गझलसरा ‘ आणि किरण मडावी यांच्या’जिंदगी भाकरीच्या दबावात आहे ‘या गझलसंग्रहांचे प्रकाशन झाले. तसेच डॉ.राहुल मोरे यांनी ‘भीमराव पांचाळे यांची गझल गायकी आणि कार्य ‘या विषयावर पी.एचडी आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी ‘उर्दू -हिंदी -मराठी भाषेतील निवडक गझल गायकांची गायन शैली ‘या विषयावर पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागताध्यक्ष सुगत वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविक करताना गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे म्हणाले, मराठी गझलेला इतर संमेलनांमध्ये उच्च स्थान मिळावे, मंच मिळावा ही माझी भावना होती. मात्र ते शक्य होत नव्हते. त्यामुळे स्वतःच गझल संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा विशाल सागर बनला आहे. आज अकोल्यात म्हणजे माझ्या कर्मभूमीत दहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन रसिकांच्या भरगच्च गर्दीत होत असल्याचा आनंद फार मोठा आहे. सुरेश भट यांनी माझ्या खांद्यावर ठेवलेला गझलेचा झेंडा मला मिरवता आला. गझलेने मला बोट धरून देश-विदेश फिरवून आणले. मराठी गझलेला निश्चितच उज्वल भविष्य आहे.मी कृतज्ञ आहे.

उद्घाटक नागराज मंजुळे यांनी जॉन एलिया यांच्या

” बेदीली क्या यूही दिन गुजर जायेंगे
सिर्फ जिंदा रहे हम तो मर जायेंगे..
कितनी दिलकश हो तुम कितना दिल जू हुं मैं
क्या सितम है कि हम लोग मर जायेंगे…

या ओळी ऐकवत उद्घाटक या नात्याने रसिकांची मने जिंकली.ते म्हणाले ,कविता- गझल ही माणसाच्या सुखदुःखा विषयी बोलते. ती जीवनाला समृद्ध करते.गझलेचा आशय हृदयाला भिडतो. कारण गझलकारांना भावनेचे सायन्स कळते. त्यातून समाजमनाचा हुंकार गझलकार मांडत असतात.कविता, गझल जगण्याला बळ देते..हे आवर्जून सांगताना ते म्हणाले की –

बहते हुए पानी ने पत्थरों पर कितने निशान छोडे हैं ,
अजीब बात है, पत्थरोंने पानी पर कोई निशान नही छोडा…

अर्थात,आपण वाहत राहू. दगडासारखं अडून बसण्यात , ताठा बाळगण्यात काहीच अर्थ नाही , वाहत राहिलो की मोठा परिणाम घडून येण्याची शक्यता आहे .’नागराज मंजुळे यांचे एकूणच भाषण अतिशय विचाप्रवर्तक होते.

संमेलनाध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, गझल ही अधिक लिहिली, ऐकली व वाचली गेली पाहिजे. कारण गझलेतून मिळणारा आनंद हा शब्दांमध्ये सांगता येण्याइतका संकुचित नाही. ज्या ज्या भाषेमध्ये गझल गेली आणि वाढली त्या भाषांना तिने समृद्ध केले आहे. आणि रसिकांना अवर्णनीय आनंद दिला आहे. खरे सांगायचे तर गझल एखाद्या नदीसारखी आहे.आपण फक्त तिच्या प्रवाहात झोकून द्यावे. आणि तिच्यावर विश्वास टाकावा. ती कधीच दगा देणार नाही. आपल्या थरारक वेगात आणि धुंद लईत ती आपल्याला आनंदाच्या समुद्राकडे नक्कीच घेऊन जाईल. ज्याच्याकडे भरपूर काही सांगण्यासारखे आहे आणि ते योग्य व नेमक्या शब्दात मांडण्यासाठी भाषेवर ज्याची हुकूमत आहे तो उत्तम गझल लिहू शकतो. गझलकार एकाच गझलेमध्ये आयुष्याचे अनेक रंग आणू शकतो .आणि तेही कुठेही लय न बिघडवता. जगाच्या आणि जगण्याच्या सगळ्या रंगांमध्ये जो रंगला आहे आणि तरीही ज्याचा स्वतःचा रंग मात्र वेगळा आहे अशा कलंदराला गझल सापडली की त्याच्या हातून गझलेचे एक देखणे इंद्रधनुष्य निर्माण होते.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘समकालीन गझलेत सामाजिक बदलांचे प्रतिबिंब उमटते का ? ‘या विषयावर परिसंवाद झाला.त्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी) हे होते. तर प्रा. सुनंदा पाटील( मुंबई) ,डॉ.अशोक पळवेकर (अमरावती ),सुदाम सोनुले (अमरावती ) हे होते. जगदीश भगत (केंद्र समन्वयक एफ एम रेडिओ वर्धा ) यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. या परिसंवादात सर्वच वक्त्यांनी विषयाची सुसंगत व प्रभावी मांडणी केली.मराठी गझलेने सामाजिक प्रश्न अतिशय तीव्रपणे मांडले. व्यवस्थेला जाब विचारले यात शंका नाही. मात्र त्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्याही वाढ होण्याची गरज आहे. असे मत पुढे आले.

तिसऱ्या सत्रात’ गझल बहार ‘ हा मुशायरा झाला.ज्येष्ठ गझलकारा नीता भिसे (महाबळेश्वर) यांच्या अध्यक्षतेखाली हा मुशायरा झाला.मिलिंद हिवराळे, गोपाल मापारी,निलेश कवडे,देवका देशमुख ,शेख आबेद,अमोल शिरसाठ,अनिल गोसे, शेखर गिरी,बापू दासरी,सुनील तांबे,शरद काळे, यांच्यासह मराठीतील नव्या व जुन्या जाणत्या अनेक गझलकरांनी त्यात सहभाग घेतला.अनंत नांदुरकर यांनी व गजानन वाघमारे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

चौथे सत्र गझल गुंजन अर्थात गझल गायन मैफलीचे झाले .त्यामध्ये श्रद्धा व जान्हवी गद्रे (पुणे), घननीळ पाटील (अकोला), सुरज सिंह (ठाणे ),कीर्ती पिंपळकर (शेगाव ),प्रा. हर्षवर्धन मानकर (अकोला) डॉ.नीरज लांडे (अकोला) यांनी रंग भरले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ‘ मुक्तांगण ‘ या पाचव्या सत्राने झाली.’ मराठी गझल विषयी मुक्त चर्चा’ असे हे सत्र होते. यामध्ये समाज माध्यमांचा अतिरेकी वापर आणि गझल , रिऍलिटी शोच्या काळात गझल गायकीचे भवितव्य, मराठी गझल आणि नवी पिढी ,मराठी गझलेत स्वर काफियाचा वापर आदी विषयांवर मोकळेपणाने चर्चा झाली. त्यात अनेकांनी सहभाग घेतला. या प्रश्नांचे निरसन गझलनवाज पंडीत भीमराव पांचाळे, संमेलनाध्यक्ष दिलीप पांढरपट्टे आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले.

सहावे सत्र बहुभाषी गझल मुशायऱ्याचे झाले. अध्यक्षस्थानी मोहीन गौहर होते. या भाषा भगिनी सोहळ्यात उर्दू ,हिंदी, मराठी, कोकणी, इंग्रजी या भाषा आणि वऱ्हाडी, अहिराणी ,आगरी , गोंडी, मालवणी या बोलीतील गझलांचे सादरीकरण केले गेले. दीपक मोहोड,संघमित्रा खंदारे,रुपेश देशमुख,किरणकुमार मडावी आदींनी गझला सादर केल्या.सातवे सत्र गझल गुंजन अर्थात गझल गायन मैफिल ( भाग २ )ने संपन्न झाले. त्यामध्ये प्राजक्ता हसबनीस (खामगाव), अजय नाईक( गोवा) हर्ष देवधरे( मोर्शी) ओंकार सोनवणे( बदलापूर) डॉ. भाग्यश्री पांचाळे- गायकवाड (मुंबई),डॉ.कुणाल इंगळे (मुंबई )नीता खडसे यांनी बहारदार गझला सादर केल्या. किरण वाघमारे यांनी मैफलीचे सूत्रसंचालन केले.

आठवे सत्र गझल बहार मुशायरा ( भाग -२ ) झाले. ज्येष्ठ गझलकार नितीन भट (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली हा मुशा यरा झाला. या मुशायऱ्यात नागेश नायडू,मंगेश गजभिये,प्रवीण हटकर, पवन नालट,महेन महाजन,वृषाली मारतोडे, गिरीश जोशी,संदीप वाकोडे,प्रियंका गिरी,माधुरी चव्हाण,मसूद पटेल आदींसह मराठीतील नवोदित व जुन्या जाणत्या गझलकारांनी सहभाग घेतला. प्रफुल्ल भूजाडे व विद्यानंद हाडके यांनी सूत्रसंचालन केले.

संमेलनाच्या नवव्या सत्रामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे व गीता पांचाळे या दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला. पंडित भीमराव पांचाळे यांची पहिली गझल गायन मैफल १९७२ साली अकोल्यात झाली होती. त्यांच्या गायकीच्या पन्नास वर्षाच्या वाटचाली निमित्त हा नागरी सत्कार झाला.न्यायमूर्ती चकोर बाविस्कर,निमा अरोरा (जिल्हाधिकारी), कविता द्विवेदी (मनपा आयुक्त) सौरभ कटियार (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद) संदीप घुगे (जिल्हा पोलीस अधीक्षक) प्रा.संजय खडसे( निवासी उपजिल्हाधिकारी) डॉ. गजानन नारे (सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार झाला.

दहावे सत्र हा समारोप सोहळा होता. त्याच्या अध्यक्षस्थानी घनश्यामजी अग्रवाल( हिंदीचे सुप्रसिद्ध व्यंगकवी) होते. संमेलनाध्यक्ष दिलीप पांढरपट्टे, गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्रकाश पोहरे (जेष्ठ पत्रकार ),निलेश जळमकर (सिने दिग्दर्शक),डॉ.नानासाहेब चौधरी ( ज्येष्ठ शल्य चिकित्सक व साहित्यिक ) हे प्रमुख पाहुणे होते. समारोप करताना घनश्याम अग्रवाल म्हणाले ,गेल्या दोन दिवसात गझलचा एक जरी शेर तुमच्या मनाला भावला असेल तर हे संमेलन यशस्वी झाले असं समजा. गझलच्या प्रत्येक शेरात प्रामाणिकता असते ती येथे दिसली. यावेळी स्वागताध्यक्ष सूगत वाघमारे यांच्यासह संमेलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा व नियोजन समितीच्या सर्व प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

संमेलनाचा समारोप गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या बहारदार गझल गायन मैफिलीने झाला.त्यांनी अनेक सुंदर गझला सादर केल्या.त्यांना सुधाकर आंबुसकर, नीरज लांडे (संवादिनी ),देवेंद्र यादव, गिरीश पाठक, पवन सिदाम (तबला) अब्रार अहमद (संतूर), प्रशांत अग्निहोत्री (बासरी ),संदीप कपूर, सुमंत अंबुसकर (गिटार) यांनी उत्तम साथ दिली. यावेळी सुधाकर आंबुसकर यांनी गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांना सलग पन्नास वर्षे संवादिनीची साथ केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रसिद्ध व्हायोलिन वादक व ज्येष्ठ संगीतकार पंडित प्रभाकर धाकडे यांना आदरांजली वाहण्यात आली.

अकोल्याच्या पोलीस लॉन्सच्या अतिशय रमणीय परिसरात हे संमेलन झाले. त्या ठिकाणी चित्र,ग्रंथ, फोटो आदींचे देखणे प्रदर्शन आयोजित केलेले होते.सुरेख रांगोळ्यानी संमेलन स्थळ कमालीचे सजले होते. उद्घाटनापासून समारोपाच्या मैफलीपर्यंत ज्येष्ठ गझलकार, अभिनेते किशोर बळी आणि अन्य निवेदकांनी अतिशय उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन केले. या गझल संमेलनाला नवे – जुने गझलकार, गझल रसिक महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि देशाच्या इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने आलेले होते.संमेलनाची निवास व भोजन व्यवस्थाही अतिशय उत्तम प्रतीची होती. गझलसागर प्रतिष्ठान आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या दहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाला विदर्भ साहित्य संघ, तरुणाई फाउंडेशन (कुटासा), प्रबुद्ध भारत संघटना ,मेलोडी ग्रुप, समर्थ एज्युकेशन संस्था, जागर फाउंडेशन, सप्तक संगीत अकादमी,अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच ,के. एस. पाटील फाउंडेशन, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा ,गझल मंथन साहित्य संस्था ,मायबोली साहित्य प्रतिष्ठान, सृजन साहित्य संघ (मूर्तिजापूर ), राष्ट्रधर्म युवामंच ,अक्षरदीप कला अकादमी ,अकोल्याची जत्रा, प्रभात किड्स स्कूल आदिनिही मोठे सहकार्य केले. संमेलनात सर्व वेळ सभागृह खचाखच भरलेले होते. सभागृहाच्या बाहेर स्क्रीनवरही संमेलन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नियोजन करण्यात आले होते .रात्रीच्या गारठ्यात शेकोटी पेटवून रसिकांनी गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांची संमेलनाच्या समारोपाची मैफल ऐकली.या गझल संमेलनाला मी संमेलनाच्या आदल्या दिवशी सकाळपासून ते समारोपाच्या मैफली पर्यंत उपस्थित होतो. मराठी गझल पंढरीचा एक वारकरी या नात्याने या संमेलनाने पुन्हा एकदा नव्या समृद्धीची भर घातली शंका नाही.


प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
+++++++++++++++++++++++++++++++++++++

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!