कोल्हापूर

.वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा रौप्य महोत्सव

वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा रौप्य महोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )

इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ, या संस्थेचे हे पंचविसाचे वर्ष आहे. त्या निमित्ताने रविवार ता.२२ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील वृत्तपत्र पत्रलेखकांचा रौप्य महोत्सवी मेळावा , ‘लोक जागर ‘या स्मरणिकेचे प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखन पुरस्कार वितरण असा संयुक्त समारंभ इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित केला आहे. रौप्य महोत्सवी वाटचाली निमित्त इचलकरंजी पत्रलेखन संघाला भरभरून शुभेच्छा….!

समाजात घडणाऱ्या घटना घडामोडी वृत्तपत्राद्वारे आपणास समजतात. या वृत्तपत्रांमध्ये समाजमनाचे खरेखुरे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या, समाजाच्या आतल्या आवाजाला लोकांपर्यंत पोहोचवणारे ‘ वाचकांचा पत्रव्यवहार ‘ ,हे महत्त्वाचे सदर असते. बहुतांश ठिकाणी प्रामुख्याने अग्रलेखाच्या पृष्ठावर असलेले हे सदर वृत्तपत्राच्या उगमापासून सुरू आहे. अलीकडे काही वृत्तपत्रे तर आठवड्यातील एखादा दिवस निश्चित करून त्यादिवशी अग्रलेखाच्या पानावर अग्रलेखाबरोबर निरनिराळ्या विषयावरची अनेक वाचकपत्रे प्रकाशित करतात.त्याच पद्धतीने काही वृत्तपत्रे आपल्या अंकातून प्रसिद्ध होणाऱ्या लेखांवर ,सदरांवर चर्चा घडवून आणण्यासाठी वाचकपत्रे प्रकाशित करत असतात.हे सारे चांगले आहेच.पण त्याचबरोबर काही दैनिकांनी व नियतकालिकांनी वाचकांच्या पत्रव्यवहाराची जागा अलीकडे कमी केली आहे असेही दिसून येते.ती त्यांनी पुन्हा उपलब्ध करून दिली तर ती सुदृढ लोकशाहीला मदत करणारी ठरेल.

लोकशाही पद्धतीतील लोकांचा जागृत सहभाग महत्वाचा असतो. लोकांच्या सार्वभौम सत्तेतील निर्णय प्रक्रियेतील लोकसहभागाची सकस व निकोप वाढ होण्याची गरज असते. ती वाढ हे सदर करत असते.असा आज वरचा अनुभव आहे.म्हणूनच त्याचे महत्त्वही मोठे आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सादरालाच खुले व्यासपीठ ,मतमतांतरे, बहुतांची अंतरे ,प्रतिसाद ,प्रतिबिंब ,आरसा अशीही अनेक नावे दिली जातात.हे सदर अतिशय वाचनीय व मननीय असते. समाजातील जागृत मंडळींना आपले मत व्यक्त करण्याची संधी देणार आहे हे हक्काचे सदर असते.काही पत्र लेखक सामाजिक भान ठेवून ,व्यापक समाजिक दृष्टिकोन ठेवून सातत्याने लिहीत असतात.वेळ,बुद्धी खर्च करून आणि पदरमोड करून लिहिणारे हे पत्रलेखक म्हणजे लोकप्रबोधनाचेच काम करत असतात असे म्हणावे लागेल.

‘ वाढत्या बेरोजगारी पासून ते घटत्या जीडीपी पर्यंत ‘आणि ‘कोरोनाच्या सर्वस्पर्शी संकटापासून ते सुशांत सिंगच्या मृत्यूचा राजकारणा पर्यंत ‘ आणि ‘ चीनची घुसखोरी ते डोनाल्ड ट्रम्प यांची आगामी निवडणूक’ आणि ‘ गावातील दवाखान्यात कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध नसणे यापासून कोरोनाची लस कधी येणार ‘ यापर्यंतच्या गावपातळीपासून ते जागतिक स्तरा पर्यंतच्या मुद्द्यांना हे सदर स्पर्श करत असते. त्याची मांडणी करत असते.जनतेच्या अनेक प्रश्नांना या सदरातून वाचा फोडली जाते.तसेच येथे मते मांडली जातात तशीच ती खोडलीही जातात.वादसंवाद ही घडत असतात त्यातूनच स्थितीशील अवस्थेतील समाजाला गतिशील बनवण्याचा प्रयत्न होत असतो. या सगळ्यामुळे चावडी पासून संसदेपर्यंत अनेक प्रश्न मार्गी लागल्याची उदाहरणे आहेत.तसेच या सदरासाठी समाजातील अनेक मान्यवरांनीही सातत्याने लेखन केल्याचे दिसून येते.त्यातूनही त्याचे महत्व अधोरेखित होते.

आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे , दिशा देणारे विचार समाजात पेरणे, त्यांचा प्रसार करणे,विचाराने माणूस जोडणे ही प्रक्रिया परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार ‘ या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. गेल्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रांनीही यातील चांगल्या पत्राला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.या सदरामुळे वृत्तपत्रांच्या आशयात आणि विषयात विविधता व व्यापकता येत चालली आहे.अशा पद्धतीने वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखकांच्या फार थोड्या संघटना आहेत. यातील अतिशय सातत्यपूर्ण काम करणारी संघटना म्हणून ‘ ‘इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटना’ महाराष्ट्रभर ओळखली जाते.

भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत विचार, उच्चार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलेले आहे.जे आपल्याला वाटते ते मोकळेपणाने व्यक्त करता येणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण असते. अलीकडे जनतेच्या मनातील जन की बात समजून न घेता मन की बात चा बोलबाला मोठा आहे. कोणतीही मान्यवर व्यक्ती प्रश्नांना उत्तरे न देता किंवा प्रश्न बाजूला करून एकतर्फी बातचीत करते तेंव्हा ती त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असली तरी आमजनतेसाठी अपूर्ण व अर्थहीन असते.माध्यमे जेव्हा मूलभूत बाबींपेक्षा सवंग व सत्ताधार्‍यांच्या सोयीचे प्रश्न चर्चेत आणतात तेव्हा सुज्ञ नागरिकांवरची जबाबदारी वाढते. लोकांचा आजही वृत्तपत्रांवरचा म्हणजे छाप्यावरचा विश्वास अधिक आहे हे नाकारून चालणार नाही.जन की बात म्हणजेच वाचकांच्या मनात काय चालले आहे ,त्यांचे म्हणणे काय आहे ? हे जाणून घेणारे व जाणवून देणारे एक सदर नियतकालिकात असते. दैनिका पासून मासिकापर्यंत सर्वत्र ‘वाचकांचा पत्रव्यवहार ‘हे सदर प्रकाशीत केले जाते. लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी आणि समाजमनातील आंदोलने टिपण्यासाठी हे सदर फार महत्त्वाचे असते.माध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते याचे कारणही त्यांनी खरीखुरी जनतेची भाषा बोलावी असे अभिप्रेत आहे.

गेली पंचवीस वर्षे अतिशय सातत्यपूर्ण पद्धतीने आणि उपक्रमशीलतेने ‘ इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ ‘ कार्यरत आहे. सर्व वृत्तपत्रातून दर महिन्याला एक सर्वोत्कृष्ठ निवडणे आणि त्या पत्रलेखकाचा जाहीर समारंभात गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करणे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र पत्रलेखकांचा भव्य जाहीर मेळावा घेणे.त्यासाठी मान्यवर पाहुण्यांना मार्गदर्शनासाठी बोलावणे. विविध महाविद्यालयातून वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळा घेणे.तसेच संघटनेच्या वतीने पत्रलेखकांचा परिचय करून देणारा गौरवअंकही काढला होता.वृक्षारोपण, रक्तदान,जनजगरणाची सायकल फेरी असेही अनेक उपक्रम राबविले जात असतात.आणि हे सर्व कार्य संघटनेचे सदस्य पदरमोड करून करत असतात.या संघटनेचे अनोखे,समाजोपयोगी,सातत्यपूर्ण,प्रामाणिक पद्धतीचे काम पाहून काही व्यक्ती व संस्था या कार्याला सहकार्यही करत असतात. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रलेखन पांडुरंग पिसे यांच्यासह मनोहर जोशी, सुनंदा चौगुले ( सुनंदाताई दोन वर्षापूर्वी कालवश झाल्या याचे मोठे दुःख आहे. ),पंडित कोंडेकर, नारायण गुरबे,महेंद्र जाधव, रमेश सुतार,अभिजित पटवा,संजय भस्मे, दीपक पंडित, दिगंबर उकिरडे,गुरुनाथ म्हातुगडे,महादेव मिणची अशी अनेक मंडळी या संघटनेचे सक्रिय कार्य करतआहेत.समाजवादी प्रबोधिनी या संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करत असते.कारण समाजवादी प्रबोधिनी प्रबोधनाचे जे वेगवेगळे उपाय व उपक्रम राबविते त्यामध्ये वाचकांच्या व्यक्त होण्याला अगदी पहिल्यापासून महत्व देत आली आहे. समाजवादी प्रबोधीनीचे हे भरीव स्वरुपाचे सहकार्य लक्षात घेऊन इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या उत्कृष्ठ पत्रलेखन पुरस्काराला प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस ‘ आचार्य शांताराम गरुड उत्कृष्ठ वृत्तपत्र पत्रलेखन पुरस्कार ‘ असे नाव दिलेले आहे.

या निमित्ताने एक गोष्ट आठवते. “लोकजागृतीचे एक माध्यम :वाचकांच्या पत्रव्यवहार ” या नावाचे विविध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वाचकपत्रांचे संकलित पुस्तक समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने १९९७ साली प्रकाशित झाले होत. त्यात प्रस्तुत लेखकाची अर्थात प्रसाद कुलकर्णी यांची आर्थिक, सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक अशा विविध विषयांवरील अनेक पत्रे समाविष्ट होती. त्याला आचार्य शांताराम गरुड यांची प्रस्तावना होती.त्यात ते म्हणतात , ” वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे केवळ रस्ता ,गटारे पाणी, वीज ,गाड्या, बाजार यासारख्या दैनंदिन संसारी व नागरी व्यवहारातील अडचणीना वाचा फोडणारे सदर असे स्वरूप आता राहिलेले नाही. अर्थात या स्वरूपाचीही लोकांच्या दैनंदिन जीवनातील मदतकारी उपयुक्तता महत्त्वाची आहेच. अनेक अडचणी दूर करण्याची दक्षता व तत्परता संबंधित सार्वजनिक सेवा विभागाने दाखविली आहेच. त्याचबरोबर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना, घडामोडी ,धोरणे, व्यवहार यांची इष्ट-अनिष्टता ,योग्यता-अयोग्यता, उपयुक्तता – उपद्रवता, लोकाभिमुखता- विन्मुखता यांची लोकपातळी वरून चर्चा, विचारविनिमय, मतप्रदर्शन ,पर्यायांची मांडणी, पाठिंबा -विरोध ,ताशेरे- इशारे ,वादसंवाद अशा अनेक रीतीने विचारांना चालना देण्याचे, लोकमानस जागृत व जाणकार करण्याचे आणि समाजजीवनाची समतोल प्रगती व्हावी यासाठी उपाय सुचवणारे ‘ लोकादेश ‘ एक प्रकारे यातून व्यक्त होत असतात. “अशा प्रकारचे पुस्तक समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केल्यानंतर गेल्या अडीच दशकात अनेक वृत्तपत्र पत्रलेखकांचे असे पत्र लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. समाजजीवनातील आणि माध्यम क्षेत्रातील एका अतिशय महत्त्वाच्या विभागातील कार्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि ते कार्य सातत्यपूर्ण पुढे नेणाऱ्या ‘ इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या भरभरून शुभेच्छा..

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच ज्येष्ठ वृत्तपत्र पत्रलेखक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!