भारतीय संविधानातील प्रदान केलेले मूलभूत अधिकार केंद्र सरकार नाकारत आहे – वसंतराव मुळीक

भारतीय संविधानातील प्रदान केलेले मूलभूत अधिकार केंद्र सरकार नाकारत आहे. देशातील सध्याच्या राजकारणातील सर्वच घडामोडीमुळे राज्यघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे सफल होत नाहीत.
नागरिकांनी मूलभूत कर्तव्य पार पाडून संविधानाच्या आदर्शाची जोपासना करावी असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे कोल्हापूर जिल्हा आयोजित शाहू स्मारक भवन येथील संविधान वाचा व संविधान वाचवा या जनजागृती मेळाव्यात बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक बबनराव शिंदे होते.
मेळाव्याच्या प्रारंभी बाजीराव पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून प्रतिज्ञा घेतली.
अध्यक्षपदावरून बोलताना बबन शिंदे म्हणाले, भारतीय संविधानात वारंवार बदल केले जात आहेत. प्रत्येक नागरिक देशाच्या सार्वभौम संस्थेचा सभासद आहे. संविधानाने स्त्री-पुरुष उभयतांना समानतेच्या जन्मताच सर्व अधिकाराना पात्र केले आहे. सार्वजनिक व्यवहाराचे स्वरूप समजावून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यापुढे आंबेडकर चळवळीतील सर्व गट एकत्रित करण्यासाठी गवई गट शाहू राजांच्या कोल्हापुरातून पुढाकार घेणार आहे.
प्रमुख पाहुण्या तिलोतमा सिद्धांत देशमुख यांनी संविधानाच्या कलमांचे ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना निर्माण करण्यासाठी पत्नी रमाबाई यांची ऊर्जा मिळाली होती. बाबासाहेबांनी संसारिक सुखाचा त्याग करून पत्नी रमाबाईंच्या आहुतीमुळे संविधानाचे शिल्पकार होऊ शकले.
गवई गटाचे कोल्हापूर युवक आघाडी अध्यक्ष सिद्धांत जी देशमुख यांनी परकीय राष्ट्र व धोरण आणि परराष्ट्रीय व्यवहार या पलीकडे जाऊन राज्यघटनेतील इतर अनुच्छेदाचे वाचन अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती माधवी देशमुख, मल्हार सेना सेनापती बबनराव रानगे, अण्णा हजारे समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नारायण पोवार , सिने अभिनेते देवेंद्र चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी केले स्वागत चंद्रकांत कांबळे यांनी केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष साताप्पा कांबळे यांनी मानले.
या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे शहराध्यक्ष शोभा कुमठेकर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव गवळी जिल्हा संघटक वर्धन गावडे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष कोंडीबा कांबळे गौतम कांबळे यांचे सह जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.