धनुष्य बाण गोठवले गेले
शिवसेना नाव ही वापरता येणार नाही!

धनुष्य बाण गोठवले गेले
शिवसेना नाव ही वापरता येणार नाही!
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
नवी दिल्ली : राज्यातील राजकीय हालचाली गेल्या शंभर दिवसात वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्य बाणावर हक्क सांगितला होता. प्रकरण कोर्टात गेले आणि शेवटी निवडणूक आयोगाने निकाल दिला.
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे. तसंच शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. नेमकी खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. शिक्षण मंत्री व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना ही आमची आहे व धनुष्य बाण सुध्दा आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर दोन्ही गटांनी बैठकांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सायंकाळी वर्षा या निवासस्थानी आपल्या गटातील आमदार व खासदार यांची बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी दुपारी आपल्या नेत्यांची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. सोमवार पर्यंत नवीन चिन्ह घेण्याची सुचना दिली आहे.
चिन्ह व पक्षाचे नाव शिवसेनेने घालवले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. दोन्ही गटांनी अंधेरी पोटनिवडणुकीत नाव व चिन्ह वापरु नये अशी सूचना दिल्याने शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अंधेरी येथील निवडणुकीत भाग न घेता भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणार आहेत.