विशेष लेख

गांधीवाद आणि त्याची सूत्रे

गांधीवाद आणि त्याची सूत्रे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com

रविवार ता.२ ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा १५३ वा जन्मदिन आहे.भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण नुकतेच साजरे केले. त्याच पद्धतीने गांधीजींना जाऊन ही आता पंच्याहत्तर वर्ष होत आहेत. कारण नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच राष्ट्रपित्याचा खून केला केला. गेल्या पंच्याहत्तर वर्षाची भारताची व जगाची वाटचाल पाहिली की गांधीजींच्या विचाराचे सार्वकालिक महत्व फार मोठे आहे हे जगाने मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गांधीवाद आणि त्याची सूत्रे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आपल्या राजकारणासाठी गांधीजींनी जे मार्ग अवलंबलेले होते ते सत्याचा आग्रह धरणारे होते. त्यांचा हा सत्याचा मार्ग अतिशय प्रभावी आणि भिन्नस्वरूपाचा होता. त्याद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला नवा मंत्र दिला. गांधीजींनी सत्य, अहिंसा, असंग्रह ,अस्तेय ( चोरी न करणे ,नको असलेली वस्तू घेणे )अभय ,स्वदेशी, स्पर्शभावना ( अस्पृश्यता निवारण )सर्वधर्मसमभाव, शरीरिक श्रम, आस्वाद ( गरजेपुरते पण सकस अन्न )आणि ब्रह्मचर्य (भोगविलास व इंद्रियावर नियंत्रण )अशी एकादश सूत्रे सांगितली होती. गांधीजी सत्याबाबत ‘ ईश्वर सत्य है ‘पासून ‘सत्य ही ईश्वर है ‘या भूमिकेपर्यंत गेलेले होते. आणि त्यांचा अहिंसा विचार हा भ्याडाचा नव्हे तर पराक्रमी शुरत्वाचा होता.

पंडित नेहरू यांनी म्हटले आहे की,’ गांधीजी सत्यमय साधनांवर जोर देत असतात .मलाही त्यांचे म्हणणे पटते, आवडते.साधने शुद्ध असावीत यावर गांधीजींनी जो भर दिला आहे तीच त्यांची सर्वात थोर अशी सार्वजनिक सेवा आहे. सत्याग्रह हे गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र आहे .’सत्य’ ही त्यांची जीवन साधना होती. त्यांनी म्हटले आहे ,”माझ्या मते सत्य सर्वश्रेष्ठ आहे.आणि त्यात असंख्य वस्तूंचा अंतर्भाव होऊन जातो.हे सत्य म्हणजे स्थूल वाचिक सत्य नव्हे. ते जसे वाचिक तसे वैचारिकही आहे. हे सत्य म्हणजे केवळ आपण कल्पिलेले सत्य नव्हे तर स्वतंत्र , चिरंतन सत्य आहे. सत्य हाच ईश्वर आहे. सत्याचे दर्शन अहिंसे शिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच ‘ अहिंसा परमोधर्म: ‘म्हटले आहे. सत्याचा शोध आणि अहिंसेचे पालन हे ब्रह्मचर्य ,अस्तेय, अपरिग्रह अभय, सर्वधर्मसमानत्व, अस्पृश्यता निवारण याशिवाय होऊ शकत नाही. मिथ्या ज्ञानाचे आपण नेहमी भय बाळगले पाहिजे. मिथ्या ज्ञान सत्यापासून दूर ठेवते आणि दूर नेते. सत्याच्या दर्शनाकरता किंवा सत्याच्या आराधनेत खरे जीवन व्यतीत करण्याची इच्छा असेल तर आम्ही मानसिक आळत झटकून मूलभूत विचार केला पाहिजे. खरे काम कधीही वाया जात नाही. तसेच सत्य वचन शेवटी कधीही अप्रिय ठरत नाही.’

सत्याबद्दल ही भूमिका घेणाऱ्या गांधीजींना जे योग्य व न्याय वाटत असेल ते सत्य असे अभिप्रेत होते.म्हणूनच मागण्यासाठी ,हक्कांसाठी ,अहिंसात्मक मार्गाने लढा देणे म्हणजे सत्याग्रह ही गांधीजींची संकल्पना होती .धार्मिक प्रवृत्ती असलेले गांधीजी सत्याग्रहाला आत्मिक बळाचा प्रकार, अध्यात्मिक हत्यारही समजत असत.अर्थात ज्यांची नीतिमत्ता मोठी असते ते सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारतात हे त्यांनी स्वतःच्याच उदाहरणावरून पटवून दिले होते. ४ डिसेंबर १९३४ रोजी एका उपोषणाच्या प्रसंगी गांधीजींनी जाहीर पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात ते म्हणतात,’ ज्यांना मानवी परिस्थितीत व जीवनात अमुलाग्र फरक घडवून आणायचे असतील त्यांना समाजामध्ये खळबळ उत्पन्न करावीच लागते. खळबळ उडवण्यासाठी साधने दोन ती म्हणजे हिंसा व अहिंसा .हिंसेचे दडपण शरीरास भासमान होत असते .आणि हिंसेला बळी पडणारी व्यक्ती हिंसेच्या साधनाने जशी दडपली जाते, त्याचप्रमाणे ते साधन वापरणारी व्यक्तीही अधोगतीला पोहोचते.परंतु उपवासासारख्या आत्मक्लेशाने आणलेल्या अहिंसेच्या दडपणाचे कार्य अगदी निराळ्या पद्धतीने होत असते .त्यामुळे शरीराला इजा न पोहोचता उलट ज्या व्यक्तीविरुद्ध ते वापरण्यात येते त्या व्यक्तीची नीतिमत्ता अहिंसेच्या सहवासाने अधिक दृढ होत जाते. ‘

‘शस्त्राने लढणाऱ्याला शस्त्रांची किंवा इतरांच्या मदतीची वाट पहावी लागते .आडवाटा शोधाव्या लागतात .पण सत्याग्रहाने लढणाऱ्याचा मार्ग सरळ असतो. त्याला कोणाचीही वाट पाहावी लागत नाही. तो एकटा असला तरी लढू शकतो. इतरांची मदत नसेल तर फळ उशिरा मिळेल एवढेच.’असे म्हणणाऱ्या गांधीजींनी आपल्या सत्याग्रह चळवळीसाठी अहिंसा ,असहकार, स्वदेशी, बहिष्कार, उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्गाचा अवलंब केला होता. जेथे अन्याय आहे तेथे शांततेने, सत्याने व अहिंसेने प्रतिकार केल्यास अन्याय नष्ट होतो. माणूस जितका अधिकाधिक सामर्थ्यवान होतो तितका त्याचा अहिंसेवरील विश्वास जास्त होत जातो. हे विचार गांधीजींनी लोकमानसावर बिंबवले. अगदी ८ ऑगस्ट १९४२ च्या भाषणातही ते म्हणाले होते ,’जगाच्या डोळ्यात आज खून चढला आहे. पण आपण शांत आणि निर्मळ दृष्टीने जगाच्या डोळ्याला डोळा भिडवला पाहिजे. ‘

असहकार, स्वदेशी ,बहिष्कार हे मार्ग गांधीजींच्या पूर्वी भारतीय स्वातंत्रलढ्यात वापरले गेले होतेच .लोकमान्य टिळकांनी याबाबत मोठी कामगिरी केली होती. गांधीजींनी या मार्गानाच पाठिंबा दिला. त्यापुढे जात उपोषणाच्या मार्गाने आपले प्रश्न सोडवण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे जनतेत जागृती होऊन त्या प्रश्नांबाबत लोकमत तयार झाले .सविनय कायदेभंगाच्या चळवळीतून त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांनीच धीट झाले पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे हे ठासून सांगितले. गांधीजींची ही साधने त्या त्या परिस्थितीत अतिशय यशस्वी ठरल्याचे दिसून येते हेच गांधीमार्गाचे मोठेपण आहे. अशा पद्धतीने अभिनव मार्गाचा ,कल्पनांचा वापर करून गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिले .त्यांचे राष्ट्रीय चळवळीची योगदान फार मोठे आहे. ते थोडक्यात सांगायचे म्हटले तर असे म्हणता येईल की, १९२० मध्ये त्यांनी असहकार आंदोलन पुकारले. आणि त्यावेळेपासून ते राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मान्यता पावले ते त्यांच्या जीवनाचे अखेरपर्यंत. तीन दशके त्यांनी भारतीय जनतेचे नेतृत्व केले. स्वतःच्या कल्पना मांडल्या. त्या लोकांना पटवून दिल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले .आपल्या नेतृत्वाने त्यांनी राष्ट्रीयसभेत आमूलाग्र परिवर्तन केले .सरकारच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचे धारिष्ट आणि क्रांतिकारकत्व त्यांनी राष्ट्रीय सभेतून सर्व सामान्य माणसात आणले. त्यानी स्वीकारलेल्या मार्गामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार बद्दलची भीड चेपली गेली. स्वातंत्र्याची चळवळ खेड्यापाड्यात पसरली .माझा भारत खेड्यातून आणि झोपड्यातून पसरलेला आहे असे ते म्हणत आणि त्या जाणिवेनेच त्यांनी अखेरपर्यंत सातत्यपूर्ण काम केले.
गांधीजींच्या जीवित कार्याचे मूल्यमापन करताना आचार्य जावडेकरांनी ‘आधुनिक भारत ‘या ग्रंथात म्हटले आहे ,’भारत खंडात सुमारे तीस वर्षे चालू असलेल्या या सत्याग्रह संग्रामातून एक अभिनव मानव संस्कृतीचा उदय होत आहे. इतकेच नव्हे तर त्या मानव संस्कृतीतून एक अभिनव क्रांतीशास्त्रही निर्माण होत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा सत्याग्रह संग्राम हे आधुनिक भारताच्या गेल्या शंभर वर्षातील इतिहासाचे एक परिपक्व फळ आहे .अथवा या काळात भारतीय संस्कृतीचे जे तत्वमंथन झाले त्यात प्राप्त झालेले ते अमृत आहे. या अमृत तत्वज्ञानाचे प्राशन केल्यास मानवी संस्कृती खरोखर अमर बनेल. मानव संस्कृतीची सत्ययुगाच्या दिशेने प्रगती करण्याचे सामर्थ्य त्यातून प्राप्त होईल.’

दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकांनीही गांधींच्या सत्याग्रह मार्गाचे स्वागत केले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी १९१८ साली लिहीलेल्या गांधीजींच्या चरित्राच्या प्रस्तावनेत लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे ,’..देशात शांतता राखण्यासाठी जे कायदे केलेले असतात त्यात राज्यकर्त्या अंमलदाराशी दांडगाई करणे आगर त्यांचा हुकूम तोडून बंड करणे या गोष्टी कितीही सदबुद्धीने केलेले असल्या तरी स्वभावतः बेकायदेशीरच मानल्या जातात .अशा वेळी ज्या देशभक्तास आपली इच्छित सुधारणा कायदेशीर रीतीने अमलात आणायची असेल ,त्याच्या मार्गात अनेक अडचणी उत्पन्न होतात. मन जळत असते .सुधारणा करण्याची उत्कट इच्छा असते. कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन करणे गैरशिस्त होय अशी खात्री असते. पण उपाय सुचत नाही .गांधी यांनी स्वीकारलेला नि :शस्त्र प्रतिकारचा ,अडवणुकीचा किंवा त्यांच्या भाषेत बोलावयाचे तर सत्याग्रहाचा मार्ग अशा प्रकारे अडचणीतच त्यांना सुचलेला असून त्यानी अनेक अडचणी सोसून त्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे तो आता शास्त्रपूत झाला आहे . ‘ टिळकांसारख्या जहाल मतवादी विचारवंताच्या या उद्गारावरूनही गांधीमार्गाचे मोठेपण कळून येते.

गांधीजींनी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे, त्याचा साकल्याने विचार करणारे तत्त्वज्ञान आपल्या कृतीतून, लेखणीतून ,वाणीतून मांडले. मानवी जीवनापुढे त्यांनी जी मुल्ये ठेवली त्यालाच गांधीवाद म्हणून ओळखले जाते. गांधीवाद ही एक विचारप्रणाली आहे. तशीच ती एक जीवनपद्धतीही आहे. राजकारण आणि नीती यांचे एकजीनसित्व त्यांनी मानले .साध्य आणि साधन दोघांच्या शुद्धतेचा आग्रह त्यांनी धरला .भारत शांततेच्या मार्गाने स्वतंत्र होईल आणि पुढे जागतिक शांततेसाठीही काम करेल याची त्यांना खात्री होती. आदर्श राजकारणात युद्धाला स्थान असू शकत नाही ही त्यांची धारणा होती . अहिंसक मार्गानेच अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे .शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा दुर्लक्षित करता कामा नये . किंबहूना तीचा गौरव झाला पाहिजे .व्यक्ती आणि समाज निर्भय असले पाहिजेत. उच्च नीच, स्त्री पुरुष असे भेद मानता कामा नये. राज्यव्यवस्था आणि उत्पादन व्यवस्था विकेंद्रीत असली पाहिजे. निसर्ग आणि मानव यांच्या संतुलन राखले पाहिजे .सत्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे .नीती हे सर्व धर्माचे सार आहे. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे .हे एकूणच गांधी विचाराचे सार आहे. म्हणूनच त्यांनी तत्वाविना राजकारण, कष्टाविना धन, शिलाविना शिक्षण, सचोटीविना व्यापार, विवेकाविना सुख, नीतीविना विज्ञान ,त्यागाविना पूजन ही सात सामाजिक महापापे सांगितली. अनुयायी मंडळी जेव्हा ‘आपण सारे गांधीवादी’ असे म्हणू लागली तेव्हा खुद्द गांधीजीनी त्याला आक्षेप घेतला आणि ‘आपण सारे अहिंसावादी’ असा बदल सुचवला होता हे लक्षात घेतले पाहिजे.

महात्मा गांधी आणि आजचा समकालीन संदर्भ फार महत्त्वाचा आहे .कारण गांधीजींचे नाव वापरायचे पण नथुरामी विचाराला अभय देत गांधी विचार नेस्तनाबूत करायचा असे पद्धतशीर षडयंत्र रचले गेले आहे. महापुरुषांचे मरण दोनदा असते. एकदा मारेकऱ्यांकडून आणि दुसरे अनुयायांकडून किंवा भक्तांकडून .आज गांधी विचाराचे मारेकरीच त्याचे अनुयायी असल्याचा मुखवटा घालून मिरवत आहेत. म्हणून धोका जास्त आहे. भारत सर्वार्थाने स्वच्छ ठेवायचा असेल तर केवळ अभियानाच्या जाहिरातीसाठी त्यांच्या चष्म्याचा लोगो वापरून चालणार नाही .तर त्यांचा साध्य व साधनेच्या शुद्धतेच्या दृष्टिकोन आपण स्वीकारणार काय ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे .दहशतवादाची, धर्मांधतेची, अतिरेकाची किंमत जगाने आणि भारतानेही फार मोठ्या प्रमाणात मोजली आहे. म्हणून तर युनोने २ऑक्टोबर हा गांधींचा जन्मदिन ‘ जागतिक अहिंसा दिन ‘म्हणून मानलेला आहे. पाशवी सत्तेलाही आत्मिक बळाने जिंकणारे एक महान संत, राजकीय नेते म्हणून गांधीजींचे नाव इतिहासात हजारो वर्षे घेतले जाणार आहे यात शंका नाही.
गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात भारतीय संसदेने त्यांना आदरांजली वाहणारा एक ठराव एक मताने मंजूर केला होता. २४ डिसेंबर १९६९रोजीचा हा भारतीय संसदेचा ठराव म्हणतो,’ हे सभागृह जन्मशताब्दी निमित्त महात्मा गांधींना, भारताच्या राष्ट्रपित्याला आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते आहे .ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ज्यांनी जनतेत एक प्रकारची स्फूर्ती निर्माण केली, ज्यांनी कोट्यावधी गरीब व पददलितांचे उत्थान केले, ज्यांनी लोकांमध्ये त्यागाची व सेवेची भावना रुजवली ,तसेच ज्या अहिंसेच्या मूर्तीप्रति लिखित स्वरूपात हे सभागृह आपली अनंत कृतज्ञता व्यक्त करत आहे ,ज्यांनी शांतता, न्याय व समतेसाठी लढा दिला आणि अहिंसा, सत्य ,राष्ट्रसेवा यांच्यासारख्या उच्च आदर्शाची देणगी आम्हाला दिली, ज्या आदर्शासाठी महात्माजी जीवन जगले व प्राणांचे बलिदान दिले त्या आदर्शाचे आम्ही पुन्हा स्मरण करतो.’

गांधी आणि गांधीवाद यावर भारतात आणि जगभर प्रचंड लेखन गेल्या शतकभरात झाले आहे. कॉम्रेड इ .एम .एस नंबुद्रिपाद यांच्यापासून डॉ. पट्टाभीसितारामय्या यांच्यापर्यंतच्या त्यांच्या अनेक समकालीनांनीही त्यांच्यावर पुस्तके लिहिली. वैचारिक विरोध करूनही गांधीजींची महानता सर्वमान्य होती .कॉ.नंबुद्रिपाद यांनी गांधीजींच्या धोरणावर कठोर टीका केली. पण त्यांनी ,’बुद्ध ,ख्रिस्त किंवा महमद यांच्याप्रमाणेच गांधीजींचा विचार केवळ आगम्य नसून कोट्यानूकोटी जनतेच्या गरजा व भावनांचे ते व्यक्त स्वरूप होते .कोट्यावधी भारतीय जनतेच्या आकांक्षा व इच्छा यांना व्यक्त करणारी महान उद्दिष्टे व नैतिक मूल्ये यांना महात्मा गांधी आमरण चिकटून राहिले. यातच त्यांची महानता सिद्ध होते. ‘ असे म्हटलेले आहे.

शेवटी गांधीवाद आणि गांधी तत्त्वज्ञानाचा विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तो एक प्रयोग होता. महात्मा गांधींनीच याबाबत म्हटले आहे की, ‘ माझ्या प्रयोगाला अध्यात्मिक अथवा नैतिक समजावे .धर्म म्हणजे नीती .आत्म्याच्या दृष्टीने आचरलेली नीती तोच धर्म. वैज्ञानिक ज्याप्रमाणे आपले प्रयोग अगदी नियमाना धरून विचारपूर्वक आणि काटेकोरपणे करतो, तथापि त्यातून आलेले निष्कर्ष तो शेवटचे म्हणून मांडत नाही. किंवा हे निष्कर्ष त्या प्रयोगाचे बिनचूक असेच निष्कर्ष आहेत ,याविषयीही तो साशंक नसला तरी तटस्थ राहतो .तसेच माझ्या प्रयोगाबाबतही माझे म्हणणे आहे. मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे. एकूण एक मनोवृत्ती तपासली आहे. तिचे विश्लेषण केले आहे .पण त्यातून निघालेले निष्कर्ष हे सर्वांच्याच बाबतीत अंतिम आहेत ,हे खरेच आहेत अथवा तेच खरे आहेत असा दावा मी केव्हाही करू इच्छित नाही. पण एक दावा मात्र मी आवश्य करू इच्छितो, तो हा की ,माझ्या दृष्टीने ते खरे आहेत आणि आज तरी ते मला स्वतःला अंतिम असेच वाटतात. ‘ इतकी नितळ, पारदर्शक भूमिका घेणाऱ्या विसाव्या शतकातील या महामानवाचे विचार पुढील अनेक शतकांना मार्गदर्शक राहणार आहेत. आजच्या हिंसक वातावरणात तर या आहिंसेच्या कृतीकर्त्याच्या विचारांची फार गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी या महामानवाला त्याच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले सदतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली तेहत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

////////////////////////////////////////////////////////

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!