विशेष लेख

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष: औषधे- उपयोगी तितकीच घातक

प्रा. राहुल घस्ते
सहयोगी प्राध्यापक,
डॉ. जे जे मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर.

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष: औषधे- उपयोगी तितकीच घातक
शहरातील एखाद्या मेडिकल शॉप जवळ काही वेळ उभारलात कि तुम्हाला अझिथ्रो, डायक्लो, अमोक्सि, डॉक्सि, मेट्रो, आयबु, सिट्रिझिन असे शब्द कानावर पडतातच. आपल्यातील बर्याच लोकांना हि औषधांची नवे आणि त्याचे उपयॊग तोंडपाठ असतील. बरेचदा आपण हि औषधे मेडिकल शॉपमध्ये जाऊन सर्रास विकत पण घेतो. कुणी किरकोळ आजारी पडलं तर हे औषध घे ते औषध घे आसा सल्ला पण काही लोक देत असतात… पण हे सगळं किती घटक ठरू शकत याची कल्पना पण आपल्यातील बयाच लोकांना नाही.
भारताला जगाचे मेडिकल स्टोर म्हंटले जाते, भारत जसा औषध निर्मितीत जगात प्रथम स्थानी आहे, तसाच त्याच्या अयोग्य आणि अनियंत्रित वापरामध्ये देखील भारताचा पहिला नंबर लागतो.
आज जागतिक फार्मासिस्ट दिवस, जगभरामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन हा २५ सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य आणि औषधे या क्षेत्रात फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) कॉंग्रेसने २००९ मध्ये २५ सप्टेंबरला वार्षिक जागतिक फार्मासिस्ट दिन (WPD) म्हणून साजरा करण्याचे ठरविले. आणि याच दिवसाचे औचित्य साधून जाणून घेऊया औषधां विषयी एका फार्मासिस्ट कडून…
सगळ्या औषधांचा जसा परिणाम होतो तसाच दुष्परिणामही होतो आणि नेमकी हीच गोष्ट सर्वसामान्यांना माहित नसते. औषधांच्या चुकीच्या वापरामुळे होणारे परिणाम बऱ्याचदा जीवावर बेतणारे असू शकतात.
औषधांच्या विषयी काही मूलभूत माहिती सगळ्यांना असणे हे फार महत्वाचे आहे. उदाहरणार्थ अँटिबायोटिक म्हणजेच प्रतिजैविके साधारणतः जिवाणू किंवा विषाणू पासून होणाऱ्या आजारात दिली जातात. जर अशी औषधे वारंवार घेतली तर यामुळे त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरु होतो, त्यालाच रेजिस्टंस तयार होणे असं म्हणतात, आणि एक वेळ अशी येते कि तुमच्या आजारपणात आश्या औषधांचा काही उपयोग होत नाही, पण दुष्परिणाम नक्कीच होतात.
बऱ्याच रोगांमध्ये लक्षणे सारखीच असतात. साधी सर्दी हि जवळ जवळ १० आजारांचे लक्षण असूशकते आणि प्रत्येक सर्दी साठी वापरली जाणारी औषधे हि वेगवेगळी असतात. उदाहरणादाखल धुळीने होणाऱ्या सर्दी साठी अँटिबायोटिक घेऊन चालणार नाही आणि म्हणूनच रोग निदान डॉक्टरांकडून करून घेणे गरजेचे असते.
औषधांची मात्रा किंवा डोस हा साधारणतः रुग्णाचे वजन, लिंग, आणि आजाराची तीव्रता या गोष्टींवर ठरविला जातो आणि त्यासाठी डॉक्टर काही समीकरणे मांडून रुग्णाला औषध व त्याची मात्रा लिहून देतात. मेडिकल दुकानातून परस्पर औषधे विकत घेणाऱ्या लोक चुकीची औषधे चुकीच्या पद्धतीने, अयोग्य मात्रे मध्ये घेतात आणि शरीराला अपाय करून घेतात. औषधें लिहून दिलेल्या मात्रेमध्ये दिलेल्या वेळेवर आणि सांगितलेल्या कालावधी पर्यंत घेणे आवश्यक असते. जर औषधे मध्येच बंद केली तर आजार अधिक बळावू शकतो.
कोणती औषधे कशी घ्यायची आणि औषध चालू असताना काय पथ्ये पाळायची याचे समज सर्वसामान्य लोकांना बऱ्याचदा नसते. अशी बरीचशी औषधे आहेत जी एकत्र घेतली तर जीव देखील जाऊ शकतो. काही औषधे घेताना काही अन्ननपदार्थ वर्ज करावे लागतात नाहीतर औषधांचा परिणाम होत नाही.
गर्भवती आणि स्तनदा मातांच्या बाबतीत तर अनेक औषधे अतिशय घातक ठरू शकतात. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांमुळे गर्भातील बालकांमध्ये अपंगत्व येणे मतिमंदता, शारीरिक व्यंग, आणि इतर दोष उद्भवू शकतात.
डायबेटिकस, ब्लड प्रेशर, मेंदू, किडनी आणि यकृत समंधी आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असते.
औषधांचा योग्यपरिणाम हेण्यासाठी त्यांची साठवणूक व हाताळणी योग्यपद्धतीने करणे देखील आवश्यक असते. काही औषधे हे सूर्य प्रकाश किंवा तापमानामुळे खराब होऊ शकतात त्यामुळे औषधावर लिहलेल्या साठवणुकीच्या सल्ल्यानुसारच औषधे ठेवावीत.
आज आज जागतिक फार्मासिस्ट दिवसा निम्मित खालील काही महत्वाच्या गोष्टीचे पालन करणायचा निर्धार करूया
१. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधें घ्या
२. औषधे योग्यपद्धतीनेच घ्या
३. औषध घेताना पथ्य पाळा
४. औषधे योग्य पद्धतीनेच साठवा
५. औषधे विकत घेताना एक्सपायरी डेट तपासून घ्या
६. औषधाचे बिल घ्यायला विसरू नका
७. औषधांविषयी कोणतीही शंका असल्यास फार्मासिस्ट ला विचारू शकता
औषधे हे सजीव सृष्टीसाठी एक वरदान आहे पण त्याच्या अयोग्य वापरामुळे होणारे परिणाम खूप भयंकर ठरू शकतात हे लक्षात ठेवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!