25.6 C
Kolhāpur
Homeरत्नागिरीपं.स. इमारत भूमिपूजन कार्यक्रमाला अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून मंत्री उदय सामंत यांनी फटकारले

पं.स. इमारत भूमिपूजन कार्यक्रमाला अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून मंत्री उदय सामंत यांनी फटकारले

रत्नागिरी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. राजशिष्टाचार बाजूला ठेवून मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो. पण अधिकारी हे जनतेचे सेवक असून त्यांनी जनतेला वेठीस धरू नये. तुम्हाला अधिकार असतील, तर मंत्री म्हणून आम्हांलाही अधिकार आहेत याचे भान ठेवा. अशा अधिकाऱ्यांना आवर घालण्याची वेळ आल्याचे सामंत यांनी ठणकावले.

सुमारे 9 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रत्नागिरी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ मंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहासमोरच्या जागेत ही इमारत उभी राहणार आहे. या इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना मंत्री सामंत यांनी ठेकेदाराला केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर, सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, नगराध्यक्ष प्रदीप उर्प बंड्या साळवी, न.प. गटनेते राजन शेट्ये, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तहसीलदार शशिकांत जाधव, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री सामंत यांच्याहस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर अल्पबचत सभागृहात हा कार्यकम पार पडला. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती नव्हती. यावरून मंत्री सामंत यांनी जि.प.च्या पमुख अधिकाऱ्यांसह सर्वांनाच खडेबोल सुनावले. उपसभापती उत्तम सावंत यांनी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांची नावे राहिली असतील परंतु जनतेचा कार्यक्रम म्हणून व मंत्री उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. हा पक्षीय नव्हे तर शासकीय कार्यक्रम आहे, याची गांभिर्याने दखल आपण घेतल्याचे सांगितले. चांगल्या कामातही राजशिष्टाचार आडवा येत असेल तर अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवले पाहिजे. राजकारणी राजकारण करण्याचे त्यांचे काम करतात, ते सत्ताधारी असो किंवा विरोधक परंतु अधिकाऱ्यांनी राजकारण करण्याचे कारण काय, असा सवाल सामंत यांनी केला. तुम्हाला राजकारण करायचे असेल तर खुशाल करा, आम्ही थांबतो, असे सांगत अधिकाऱ्यांकडून होणारे राजकारण वेदनादायी आहे. या अधिकाऱ्यांना वेळीच आवर घाला, असा सल्ला सामंत यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिला.

मंत्री म्हणून आम्हांलाही अधिकार आहेत याचे भान ठेवा. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला अनेकवेळा मला निमंत्रण नसते. काहीवेळा कार्यक्रमापूर्वी सांगितले जाते. परंतु राजशिष्टाचार बाजूला ठेवून मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो. जनतेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, हे माझे कर्तव्य आहे. येथे मी राजशिष्टाचार बघत बसत नसल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे प्रशासन नेमकं काय करतंय? हे तपासण्याची आता वेळ आल्याचे सांगितले.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा