25.6 C
Kolhāpur
Homeकोल्हापूरजन्मदात्या पित्यानेच चहा साठी घेतला चिमुकल्याचा बळी, भिंतीवर आपटून, गळा दाबला

जन्मदात्या पित्यानेच चहा साठी घेतला चिमुकल्याचा बळी, भिंतीवर आपटून, गळा दाबला

शाहुवाडी तालुक्यातील आरव केसरे या सहा वर्षीय बालकाच्या खुनाचे गूढ उकलण्यात शाहूवाडी पोलिसांना बुधवारी (दि.6) सायंकाळी यश आले. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून जन्मदात्या पित्यानेच आरवची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. चिमुकल्या बालकाची झालेली निर्घृण हत्या, आणि त्याच्या शरीरावर गुलाल, हळदी, कुंकु टाकल्याने व्यक्त होत असलेला नरबळीचा संशय या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले होते.

राकेश रंगराव केसरे (वय२७) असे या मुलाच्या वडीलाला पोलीसांनी अटक केली ले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या आरवचा राकेशने भितीपोटी गळा आवळून जीव घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आले. राकेशविरोधात पोलिसांनी कलम 302, 201 अन्वये अनुक्रमे हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या मृतदेहावर गुलाल टाकल्यामुळे तो नरबळीचा प्रकार असावा अशी चर्चा सुरु होती. मात्र या प्रकरणाशी नरबळीचा काहीही संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हा नरबळीचा प्रकार आहे की काय या दीशेने पोलिसांनी तपास सुरु केला होता पण नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दीशा पूर्णपणे बदलली. काल दिवसभरात पोलीसांनी १२ ते १५ जणांकडे कसून चौकशी केली. मात्र बालकाच्या हत्येचे गुढ उलगडले नव्हते. अतिशय संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी मुलाच्या जवळच्या नातेवाईकांकडे सुरु असलेल्या चौकशीबाबत गुप्तता बाळगली होती. या चौकशीत महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. नातेवाइकांच्या माहितीतील विसंगतीमुळे हा तपास ठोस निष्कर्षाप्रत पोहचला नसल्याचे पोलिस सांगत होते. पण पोलिसांच्या तपासाच्या दिशेवरून या खुनाच्या संशयाची सुई मुलाच्या जवळच्या व्यक्तीवरच स्थिरावल्याचे चित्र होते.

बुधवारी सायंकाळी सहाच्या वाजता संशयित राकेशला चौकशी साठी बोलावून घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी त्याची पत्नी साधना, सासू, सासरा तसेच अविवाहित मेव्हणी यांना बांबवडे पोलिस दुरक्षेत्रात हलविण्यात आले होते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता राकेशने खुनाचा गुन्हा कबूल केला असून संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

चहासाठी गेला आरवचा बळी

रविवारी सायंकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी राकेशला चहा हवा होता. यावेळी त्याने घराबाहेर गेलेल्या पत्नी साधनाला बोलावून आणण्यास आरवला सांगितले, मात्र आरवने जाण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात राकेशने आधी मुलाला भिंतीवर आपटले आणि त्याच्या छातीवर जोराचा ठोसा मारला. हा ठोसा वर्मी लागल्याने आरव तात्काळ बेशुद्ध पडला. यावेळी बिथरलेल्या राकेशने आरवचा गळा दाबून खून केला आणि लगबगीने घरामागील पडक्या खोलीत मृतदेह दडवून ठेवला. संशय येऊ नये म्हणून त्याने आरव बेपत्ता झाल्याचा बनाव रचला आणि पोलिसांत फिर्याद देऊन सरुड येथील हॉटेलवर कामाला निघून गेला. दुस-या दिवशी राकेशनेच रात्रीच्या सुमारास आरवचा मृतदेह हळद, कुंकू आणि गुलालाने माखून घराजवळच्या बोळात टाकला.

पत्नीलाही संपवण्याचा होता विचार
आरोपी राकेश आणि पत्नी साधना यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यातून तिलाही संपवण्याचा त्याचा विचार होता. परंतु आरव बेपत्ता झाल्याच्या बातमीने घरात पै-पाहुणे, नातलग तसेच पोलिसांनची वर्दळ असल्याने त्याला आपला विचार प्रत्यक्षात आणता आला नाही. यात पोलिसांनी साधनाला जाणीवपूर्वक राकेशपासून दूर ठेवून तपास सुरु ठेवत शेवटी राकेशच्या मुसक्या आवळल्या. पत्नी साधनाला संपवून आपण स्वतःपोलिसांत हजर राहणार होतो, असा कबुलीही राकेशने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान हत्येचे गूढ उकलण्यात दिरंगाई होत असल्याने कापशी गावात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. जलदगतीने तपास करून संशयीतांना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिक लोक जमाव गोळा करू पाहत होते. त्यांना डीवायएसपी साळुंखे आणि पोलिस निरीक्षक पाटील यांना संयम बाळगण्याचे आवाहन करावे लागले होते. . दरम्यान शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आरवचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी वजनदार वस्तूंचा किंवा हाताचा जोरदार घाव बसून छातीच्या दोन बरगड्या तुटलेल्या होत्या.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा