25.6 C
Kolhāpur
Homeक्रीडास्म्रीती मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ विक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला...

स्म्रीती मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ विक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना गुरुवारपासून (३० सप्टेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. दरम्यान, या सामन्याच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांनी टीचून फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला पूर्णपणे बॅकफुटवर टाकले आहे. तर सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधनाने शतकी खेळी करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघाने वनडे मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभूत केले होते. या पराभवानंतर भारतीय संघाने एकमात्र कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलिया संघावर हल्लाबोल केला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात स्म्रीती मंधना आणि शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ९३ धावांची भागीदारी केली होती. यानंतर शेफाली वर्मा ३१ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतली होती.

शेफाली वर्मा बाद होऊन परतल्यानंतर ही स्म्रीती मंधानाने कुठलाही दबाव येऊ दिला नाही. तिने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि पुल शॉट खेळून खेळी सजवली आणि सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१ ऑक्टोबर) ५२ व्या षटकात तिने एलिस पेरीच्या चेंडूवर चौकार मारत आपले शतक साजरे केले.

यासह ती ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतक झळकावणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. इतकेच नाही तर कसोटीत ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारी ती पहिली आशियाई महिला खेळाडू देखील ठरली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियामध्ये तीनही क्रिकेट स्वरूपात सर्वात मोठी खेळी करणारी ती भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने कसोटी क्रिकेटमध्ये १२७ धावांची खेळी केली तर, वनडेमध्ये १०२ आणि टी -२० मध्ये ६६ धावांची खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिला क्रिकेटरने केलेल्या या सर्वोच्च खेळी आहेत.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी (३० सप्टेंबर) भारतीय महिला संघाला १ गडी बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. स्म्रीती मंधाना नाबाद ८० तर पूनम राऊत १६ धावा करत मैदानावर टिकून होती. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. स्म्रीती मंधाना १२७ धावा करत माघारी परतली. तर पूनम राऊतने ३६ धावा केल्या. पहिले सत्र संपले तेव्हा यस्तिका भाटीया २ धावांवर आणि मिताली राज १५ धावा करून मैदानावर टिकून आहे. भारतीय संघाने ८४ षटकांत ३ गडी बाद २३१ धावा केल्या आहेत.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा