Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न

मनोरंजन

काल बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान चाहत्यांना सोडून गेला आणि आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल  रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने  मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. चाहतेही शोकाकूल आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ट्विट केली. ऋषी कपूर गेलेत… मी पुरता कोसळलोय, असे ट्विट त्यांनी केले.  ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण  हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *