यज्ञ संस्कृती की अज्ञसंस्कृती

अध्यात्मिक

विचारतरकराल?

ले: डॉ.नरेंद्र दाभोलकर

भाग २६

यज्ञसंस्कृतीकीअज्ञसंस्कृती ?

( पुढे चालू….)

भंपकपणा करणारे लोक सर्व समाजात सर्व काळात असतात. पण खरी वेदना आहे ती ही की जनांचा प्रवाह खळाळून त्यांच्याच मागे कसा जातो ? सारासार बुध्दी गहाण कसा टाकतो ? भारतातील सर्वप्रथम साक्षर झालेल्या राज्यात, शिक्षणाचे प्रमाण भरपूर असलेल्या राज्यात पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दल एवढे जबरदस्त आकर्षण लोकांना वाटते कसे ? धर्मशास्त्रे, वेदपुराणे यांच्यामध्ये आपल्या आजच्या प्रश्नांची उत्तरे लोक भक्तिभावाने शोधतात, मानाने मिरवतात, त्यांना प्रश्न विचारल्यावर संतप्त होतात. ही मानसिकता धर्मांध राजकारणाला सुपीक भूमी निर्माण करते. ख-या प्रश्नाचे भान हरवते. संयोजकांच्या मताप्रमाणे या यज्ञातून देशाला मानवी रीतीने वागण्याची बुध्दी येण्याऐवजी बुध्दी गहाण टाकण्याचा राजरस्ता खुला होतो आणि विकासाऐवजी विनाशाकडे वाटचाल चालू राहते.

या यज्ञाची खास घरगुती पावरफुल आवृत्ती म्हणजे अग्निहोत्र. पुन्हा थेट वेदापासून घेतलेली, देशात, परदेशात घराघरात पोचलेली. त्याबद्दल सांगितले जाते ते असे, –


परमसद्गुरू श्री. गजानन महाराज यांनी १९४४ मध्ये दस-याच्या दिवशी अखील जगताला वेदाचे सार असलेला सप्तश्लोकी धर्मोपदेश केला त्यात जे पंचसाधन मार्ग सांगितले त्यामध्ये यज्ञसंस्थेस अग्रस्थान दिले आहे. वायुमंडलाच्या शुध्दीपासून पूजेच्या उत्पत्तीपर्यंतच्या सर्व घटकांवर यज्ञाचा प्रभाव असून ऋग्वेदास मान्य असलेल्या यज्ञाचे काळाच्या ओघात रुप बदलून सर्वसामान्य जनांस अत्यंत सोप्या पध्दतीने अग्निहोत्र उपासना सांगितली.

उपासना विधी अगदी साधा, सोपा, सरळ. तांब्याचे अथवा मातीचे तीन पायांचे पिरॅमिड आकाराचे पात्र घ्यावे. त्यामध्ये गाईच्या शेणाच्याच गोवरीचा तुकडा ठेवावा. गाईच्या तुपात भिजवलेली फुलवात मध्ये ठेवून अग्नी प्रज्वलीत करावा. दोन चिमटी तांदूळ तुपात माखून त्याची आहुती काही विशिष्ट मंत्र उच्चारून बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी द्यावी. बस्स. एवढेच करावे. विधी छोटा अगदी लहान पण फल केवढे महान ! अखील मानवजातीवर उपकार करणारे.

या उपासनेचे आद्यपीठ असलेल्या शिवपुरी अक्कलकोट येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन वैदिक सायन्स या संस्थेचे मुखपत्र ‘अनादी’ मध्ये या उपासनेमुळे घडून येणा-या चमत्काराच्या दिलेल्या तपशीलातील नोंदी बघण्यासारख्या आहेत.

अग्निहोत्र सूर्योदय व सूर्यास्ताच्या अचूक वेळीच करावे. नाहीतर फलदायी परिणाम मिळत नाही. ज्यावेळी सूर्य उगवत असतो त्या वेळी त्या त्या भागातील वातावरण विद्युतशक्तीने भारित असते. त्याचवेळी केलेल्या अग्नीहोत्रामुळे सूर्यमालेची चैतन्यशक्ती पृथ्वीकडे अधिक प्रभावीपणे येऊ शकते. सूर्यास्तावेळी जंतूंची धोकादायक वाढ वातावरणात होत असते. अग्नीहोत्र त्यावर फारच परिणामकारक ठरते.

गायीच्या शेणात किरणोत्सर्गापासून संरक्षण देण्याची शक्ती असते असे रशियन शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गायीच्या शेणाच्या केवळ वासामुळे मलेरियाचे जंतू आणि ताप नाहीसे होतात असे इटालियन शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. तूप गाईचेच हवे. केवळ गायीच्या शुध्द तुपामुळेच अग्नीहोत्र झालेल्या ठिकाणावरील सर्व रोगजंतू नाहीसे होतात. गायीच्या शुध्द तुपाशिवाय हा विधी केल्यास तो माणसाला व वातावरणाला अपायकारक ठरतो.

गायीच्या तुपाने माखलेल्या तांदुळाची समंत्र आहुती दिल्यामुळे गायीचे शेण, गायीचे तूप, मंत्र व अचूक वेळ यांच्या एकत्रित प्रभावातून जे वायू तयार होतात ते वातावरणात सर्वात वर जातात व तसे जाताना विषारी, अस्वच्छ हवा स्वच्छ करतात. प्रदूषण विरोधात सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे अग्नीहोत्र.

अग्नीहोत्रातील राखेचा शेतातील पीक वाढीसाठी अतिशय प्रभावी उपयोग होतो. यातले काय सिध्द झाले ? कधी झाले ? कसे घडले ? कोठे झाले ? साध्या तर्काशी जे विसंगत आहे ते एकदम शास्त्रीयदृष्ट्या मान्यताप्राप्त कसे ठरले ?

सूर्योदयाच्या वेळी वातावरण विद्युत शक्तीने भारित असते आणि सूर्यास्ताला वातावरणात विषारी जंतू वाढत्या प्रमाणात वळवळत असतात याला पुरावा काय ?

गायीच्या तुपामध्ये ( आणि शेणामध्येही ) अद्भूत सामर्थ्य असते आणि म्हशीचे तूप वा शेण याने अग्नीहोत्र केले तर वातावरण व माणूस याला अपाय होतो या विधानाला कोणत्या प्रयोगशाळेत प्रमाण मिळाले ?

अग्नीहोत्रातील राखेने पिके जोमदार वाढतात असे कोणत्या कृषी विद्यापीठात शिकवले जाते ? साजूक तूप आणि तांदूळ जाळून पिकाच्या वाढीला खत मिळवणे यात शहाणपणा कोणता ?

कुठल्याही ज्वलनप्रक्रियेत प्राणवायू वापरला जातो व कर्बद्विप्राणिल वायू बाहेर फेकला जातो. स्वाभाविकच वातावरणाचे प्रदूषण वाढते. अग्नीहोत्रातल्या ज्वलनामध्ये असे काय आगळेवेगळे निराळे आहे की ज्याच्यामुळे ज्वलन होते तरी प्रदूषण मात्र कमी होते ?

क्षणभर अग्नीहोत्राने वातावरण शुध्द होते असे मानू, पण दोन चिमूट तांदूळ आणि थोडे तूप यांनी केवढे क्षेत्रफळ प्रदूषणमुक्त होते ? एवढा छोटासा विधी दिवसातून फक्त दोनदा करून तो पृथ्वी व्यापणा-या प्रदूषणाच्या विरोधात सर्वात प्रभावी अक्सरी इलाज कसा ठरतो ? अग्नीहोत्राचे साधक व त्याचे चिकित्सक यांनी एकत्रितपणे प्रयोग करण्यास काय हरकत आहे ?

हे काही मुक्त विचारतरंग नाहीत. चळवळीत हे प्रश्न आम्ही अग्नीहोत्राच्या प्रवक्त्यांकडे उपस्थित केले आहेत.

प्रतिसाद काय मिळतो ?
शास्त्राच्या कसोटीच्या रिंगणात कोणी येत नाही. उत्तराचा बाह्य रोख असतो. प्रश्न श्रध्देचा आहे, ज्ञान वेदातले आहे. आणि मनातला संताप हा असतो की हे प्रश्नचिन्हांकित करताच कसे ? साक्षात वेदाला आव्हान देता ?

ज्याला सत्याला सामोरे जायचे असते तो अनेक ठिकाणी आव्हान देतो. सत्याचे त्यामुळे काहीच बिघडत नाही. ते सत्यच असते. सत्यच राहते. बिघडते ते विशेषतः तथाकथित ज्ञानाच्या नावाखाली ज्यावेळी पुत्रप्राप्तीचे, विश्वशांतीचे, पर्यावरणारक्षणाचे दावे केले जातात त्यावेळी. ते तपासावे लागतातच.

श्रध्देच्या आचरणाचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य तर प्रत्येक भारतीयाला आहेच. त्याचा आदर करावयास हवा. पण विचाराचे स्वातंत्र्य अन्य सर्वांनाही आहे. त्याचे काय ? नरहर कुरुंदकरांनी एके ठिकाणी फार चांगले विवेचन केले आहे. “समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य सजावयाचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एका बाजूने आपण सहिष्णू असावे लागते आणि दुस-या बाजूने जबाबदार. आज आपल्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणा-याबाबत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रध्दांच्यावर आघात करणा-यांच्या विचारांविषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणीच कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रध्दा जपायच्या या दिशेने आपला सहिष्णुतेचा प्रवास चालू असतो. मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करावयाची आणि या चिकित्सेबाबत श्रध्दा कितीही दुखावोत, सहिषाणुतेने वागायचे या दिशेने आपण प्रवास केला पाहिजे. स्वातंत्र्याचा प्रश्न दुस-या बाजूने जबाबदारीशीही निगडीत आहे. विचार मांडणा-याने ‘मी विडंबन करणार नाही, विपर्यास करणार नाही, असत्यालाप करणार नाही, सत्य नाकारणार नाही, खंडन विचाराचे करेन, व्यक्तीचे करणार नाही अशा जबाबदा-या मान्य कराव्या लागतात.” अशा सत्यशोधनासाठी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे आम्ही उत्सुक आहोत; वेदांती कधी पुढे येतात याच्या प्रतिक्षेत आहोत.

मधुकण

💚 भंपकपणा करणारे लोक सर्व समाजात सर्व काळात असतात. खरी वेदना आहे ती ही की जनांचा प्रवाह खळाळून त्यांच्याच मागे कसा जातो ?

💚 धर्मशास्त्रे, वेदपुराणे यांच्यामध्ये आपल्या आजच्या प्रश्नांची उत्तरे लोक भक्तिभावाने शोधतात, मानाने मिरवतात, त्यांना प्रश्न विचारल्यावर संतप्त होतात. ही मानसिकता धर्मांध राजकारणाला सुपीक भूमी निर्माण करते. ख-या प्रश्नांचे भान हरवते.

💚 यज्ञाची खास घरगुती पॉवरफुल आवृत्ती म्हणजे अग्नीहोत्र !

💚 यज्ञसंस्थेस अग्रस्थान देऊन वायुमंडलाची शुध्दी, पूजेपर्यंतच्या सर्व घटकांवर प्रभुत्व असणारी, ऋग्वेदास मान्य अशा यज्ञाचे काळाच्या ओघात रुप बदलून, सामांन्यांना सोपी असलेली उपासना म्हणजे अग्नीहोत्र !

💚 गायीच्या शेणात किरणोत्सर्गापासून संरक्षण देण्याची शक्ती असते असा रशियन शास्त्रज्ञांचा, तर शेणाच्या केवळ वासाने मलेरियाचे जंतू आणि ताप नाहीसे होतात हा इटालियन शास्त्रज्ञाचा शोध ! दिव्यच !! अग्नीहोत्र झालेल्या ठिकाणी सर्व रोगजंतू नाहीसे होतात ! हा तर कळसच ! अग्नीहोत्राची राख शेतातील पीक वाढीसाठी अतिशय प्रभावी म्हणे !

💚 सूर्योदयाच्या वेळी वातावरण विद्युत शक्तीने भारित असते आणि सूर्यास्तला वातावरणात विषारी जंतू वाढत्या प्रमाणात वळवळत असतात ! याला पुरावा काय ?

💚 प्रश्न श्रध्देचा आणि ज्ञान वेदातले यात प्रत्यक्ष व्यवहारात मानवाचे आरोग्य टांगणीला !

💚 श्रध्देच्या आचरणाचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य तर प्रत्येक भारतीयाला आहेच. त्याचा आदर करावयास हवा. पण विचाराचे स्वातंत्र्य अन्य सर्वांनाही आहे. “समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य सजावयाचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एका बाजूने आपण सहिष्णु असावे लागते आणि दुस-या बाजूने जबाबदार !

(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *