रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ ग्रा.पं.नी कोरोनाला वेशीवरच रोखले

आरोग्य महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ ग्रा.पं.नी कोरोनाला वेशीवरच रोखले

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले दीड वर्ष कोरोनाने थैमान घातले आहे. मागील दोन महिन्यांत तर वर्षभराच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘अनलॉक’मध्येही जिल्हा चौथ्या स्तरावर असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीं पैकी ६५ ग्रामपंचायतीं मध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नसल्याने येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या सुरक्षेच्या योजनांची प्रशंसा होत आहे.
गतवर्षी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्राम कमिटीच्या माध्यमातून जनजागृती व उपाययोजनांबाबत प्रयत्न सुरू झाले होते. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा, महसूल, पोलिससह विविध विभागांमार्फत प्रत्येक पातळीवर कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या ८४६ पैकी ६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्‍त आहेत. यातही सर्वाधिक १८ ग्रामपंचायती या दापोली तालुक्यात आहेत. तब्बल सव्वा वर्ष या ग्रामपंचायतींनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळवले आहे.
खेड तालुक्यातील कर्जी या गावाचा सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. या ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. शासनाने कोरोनामुक्‍त ठरणार्‍या ग्रामपंचायतींसाठी पारितोषिक जाहीर केले आहे. यात शासनाच्या अटी-शर्थीमध्ये जिल्ह्यात कर्जी गावाने आघाडी घेतल्याचे सध्या चित्र आहे. दापोली तालुक्यातील पोफळवणे तर चिपळूण तालुक्यातील बोरगावाने पारितोषिकाच्या शर्यतीत शड्डू ठोकला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायती कोरोनामुक्‍त ठेवण्यात येथील ग्रामस्थांसह ग्रामकमिटी, सरपंच, आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका यांचे योगदान मोठे आहे. जिल्हा प्रशासन व सर्व कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेतच परंतु ग्रामस्थांनी पाळलेल्या निर्बंधामुळेच या ६५ ग्रामपंचायती आतापर्यत कोरोनामुक्‍त राहिल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ यांनी सांगितले.

💠 कोरोनामुक्‍त ग्रामपंचायती :

● खेड – कर्जी, सवणस, तुंबाड, चौगुले मोहल्‍ला, जैतापूर, तुळशी खु व बु.आणि भेलसई.

● दापोली – आडे, गवे, मुगीज, शिरफळ, डौली, आपटी, शिरवणे, करंजाळी, विरसई, साकुर्डे, पोफळवणे, करंजगाव, बावळी बु., देहेण, सुकोंडी, नवसे, कवडोली, भोपण.

● लांजा – वेरवली खु., पुनस, वडगाव हसोळ.

● रत्नागिरी – चरवेली, वळके, मेर्वी

● राजापूर – आडवली, हरळ, डोंगर, विले, शेडे, राजवाडी.

● संगमेश्‍वर – पाचांबे, डावखोल, देवळे, घाटीवळे, ओझर खु., बेलारी बु., देवडे, साखरपा, घोळवली.

● चिपळूण – बोरगाव, खोपड, तळवणे, दावणगाव

● गुहागर – अडूर, मासू, उमराठ, मुंडर, कुटगिरी

● मंडणगड – दाभट, कुडूप खु., मुरादपूर, पिंपळाली, पडवे, तोंडली, वाल्मिकीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *