आत्मनिर्भरतेचा जयघोष पण कृती भिकेला लावणारी

देश-विदेश

भारतात कोरोनाचे संकट वाढण्यासाठी सर्वस्वी केंद्रसरकार आणि त्याचे धोरणकर्ते कारणीभूत आहेत. हे आता भारतीय जनतेलाच नव्हे तर जगातील माध्यमांनाही कळून चुकले आहे. कोणताही मागचा पुढचा विचार न करता धोरण जाहीर करण्याचा नेतृत्वाचा मनमौजी फाजील आत्मविश्वास देशाच्या विनाशाला कारण ठरला आहे. मध्यरात्री पासून अचानक नोटाबंदी पासून लॉकडाऊनचे घेतलेले निर्णय देशाला उध्वस्त करणारे ठरलेले आहेत. राजकीय विरोधक व त्यांची मते यांची कायम खिल्ली उडविण्यात धन्यता मानणारी सुशिक्षित पण असंस्कृत सोशल मीडियावरील टीमची सत्य समोर आले की नेहमीच दातखिळी बसते हे वारंवार दिसून आले आहे. अनेक बाबींप्रमाणेच कोरोनाचे संकट ओळखण्यात नेतृत्व कुचकामी ठरले आहे. खोटा आव आणून,मुख्य मुद्दा सोडून बष्फळ बडबड करून अथवा लूक बदलून कमकुववतपणा झाकता येत नसतो.व्यक्तिगत कमकुवत पणातूनच संस्थात्मक कमकुवतपणा बोकाळला आहे हे वर्तमान भारतीय राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.कारण राजकारण हे राजकारण न राहता केवळ सत्ताकारणात परावर्तित झाले आहे. केंद्र सरकार ईडी पासून रिझर्व्ह बँकेपर्यंत सर्व स्वायत्त संस्थांमध्ये पद्धतशीर व निलज्जपणे हस्तक्षेप करत आहे. देशाचे शीर्षस्थ नेतृत्वच आपल्या पदाच्या उंची प्रमाणे वागत नाही.भारतीय राज्यघटना ,भारतीय परंपरा , भारतीय संस्कृती या साऱ्याची पायमल्ली करत आहे.त्यामुळे आर्थिक,सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात वेगाने अधोगती सुरूआहे. सत्ताधारी वर्गाने इतक्या अल्पावधीत इतका भ्रमनिरास केल्याचे व देशाला खाईत लोटल्याचे खरंच गेल्या सत्तर वर्षात घडले नव्हते. जयघोष आत्मनिर्भरतेचा आणि कृती भिकेला लावणारी अस सर्व क्षेत्रांत दिसत आहे. पण अशी ढोंगबाजी व बेमुर्वतखोरी फार काळ भारतीय जनमानस फार काळ चालवून देत नाही.हा इतिहास आहे. देशप्रेमाचा ठेका घेतल्यासारखी भाषा करणाऱ्यांनीच देश विकायला सुरुवात केली आहे.सध्या सर्वच बाबतीत संकुचितता व अतिसुमारीकरणाचा काळ आहे.कारण आपण व आपले अंध समर्थक सोडून अन्य सर्व राजकीय नेते अर्थतज्ञ , समाजशास्त्रज्ञ , शास्त्रज्ञ ,डॉक्टर , विचारवंत , कलावंत , पत्रकार मूर्ख आहेत अशा भ्रमात सत्ताधारी वागत आहेत. काही अंधही आता डोळस होऊ लागले आहेत. निवडणुकीतील विजयापेक्षा त्यासाठी लोकांनी निवडून दिले त्यांच्यासाठी काम करणे महत्वाचे असते. शेवटी मन की नही जन की बात महत्वाची असते, नाहीतर रडीचा डाव खेळत विरोधी ट्विट डिलीट करावी लागतात. सोशल मीडियावर समर्थकांची पगारी भरती करावी लागते.पण संसदीय लोकशाहीत अंतिम सत्ता लोकांची असते. हुकूमशाहीचा माज उतरतो व लोकशाहीचा ताज उंचावतो हे सार्वकालिक सत्य आहे.

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *