…अन्यथा पुढील टप्प्यात महावितरण कंपनी लॉकडाऊन करु – आमदार प्रकाश आवाडे

कोल्हापूर राजकीय

लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी ताराराणी पक्ष आक्रमक

इचलकरंजी/प्रतिनिधी –
सर्वसामान्य जनता, सुक्ष्म व लघुउद्योगांना अडचणीच्या काळात मदतीची गरज असताना तीनचाकी सायकलवरील राज्य सरकारकडे मात्र दानत दिसून येत नाही. घरगुतीसह यंत्रमाग व सुक्ष्म आणि लघुउद्योगांना केवळ लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत देण्याची आमची मागणी आहे, ती सरकारला पूर्ण करावीच लागेल. . पुढील टप्प्यात महावितरण कंपनी लॉकडाऊन करु. शिवाय थेट मुंबई मंत्रालयास घेराव घातला जाईल, असा सज्जड इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी येथे बोलताना दिला. मागण्या होईपर्यंत हा लढाच असा सुरु राहणार असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले.
लॉकडाऊन काळातील घरगुती वीज ग्राहकांना प्रतिमहा 100 युनिटपर्यंत सवलत मिळावी, यंत्रमागासह सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी उद्योग योजना जाहीर करावी, मल्टिपार्टी कनेक्शन तातडीने द्यावे आणि शेतकर्‍यांना सौरऊर्जा युनिटसाठी 50 टक्के सबसिडी द्यावी आदी मागण्यांसाठी ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली महावितरण कंपनी कार्यालयावर भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड मोठ्या संख्येने निघालेल्या या रॅलीत सर्वसामान्य नागरिक, यंत्रमागधारक, युवक, महिला, लघुउद्योजक आदींसह तृतीयपंथी सहभागी झाले होते. ताराराणी पक्ष कार्यालयापासून निघालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन महावितरण कार्यालय येथे आली. त्याठिकाणी आमदार आवाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता निरज आहुजा यांना निवेदन देण्यात आले.
आमदार आवाडे म्हणाले, इचलकरंजी शहर, दोन औद्योगिक वसाहती, आसपासची 12 गावे, लक्ष्मी औद्योगिक वसाहत, पार्वती औद्योगिक वसाहत असे सर्व मिळून सुमारे 1 लाख 16 हजार वीज ग्राहक आहेत. त्यामध्ये शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे 90 हजार घरगुती वीजग्राहक आहेत. या घरगुती ग्राहकांसाठीच 100 युनिटपर्यंतची सवलत मिळावी हीच आमची मागणी असून ती केवळ लॉकडाऊन काळापुरतीच लागू करावी. त्यासाठी दरमहा किमान 2.50 कोटी रुपये लागतील. तर यंत्रमाग आणि लघुउद्योगांसाठी 1 रुपयांची सवलत दिल्यास साडेतीन ते चार कोटी रुपये लागतील.  इचलकरंजी विभागातून वीज वितरण कंपनीला दरमहा 55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे किमान तीन महिन्यांसाठी सवलत द्यायची झाल्यास दरमहा 7 कोटीप्रमाणे 21 कोटी रुपये लागतील. संपूर्ण सांगली जिल्ह्याचे उत्पन्न 52 कोटी रुपये तर कोल्हापूर शहरासह शिरोली, कोल्हापूर व गोकुल एमआयडीसी व आसपासची गावे मिळून अवघे 23 कोटी रुपये उत्पन्न आहे. त्यामाने इचलकरंजीतून मिळणारे उत्पन्न अधिक असून सवलतीची रक्कम अत्यल्प असल्याने कमी रकमेत महावितरणालाच लाभ होणार असल्याने शासनाने ही मदत देणे अत्यंत गरजेचे आहे.
यंत्रमागासाठी कृषी संजीवनीप्रमाणे यंत्रमाग संजीवनी योजना लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लघुउद्योगांसाठीसुध्दा उद्योग योजना लागू करण्याची गरज आहे. तर यंत्रमागासाठी मल्टिपार्टी कनेक्शन संदर्भात मंत्र्यांनी आदेश देऊनही ते दिले जात नाही. त्यामागचे गौडबंगालच समजून येत नाही. आमच्या या मागण्या कोणा मोठ्या उद्योजकांसाठी नसून गोरबरीब सर्वसामान्य जनता, लघुउद्योगांसाठी आहेत. त्या सरकारला मान्य कराव्यात लागतील. आणि त्या घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. वाढीव वीज बिलाच्या निमित्ताने जनतेचा राग, रोष काय असतो आणि त्रास दिल्यास उद्रेक कसा होतो हे  दिसून येत आहे. तीनचाकावर चाललेले हे सरकार गोरगरीबांसाठी नाही हे जनतेने जाणले असून सरकारचे खरे स्वरुप ओळखले आहे. कोरोनाचा काळ आणि लघुउद्योगांना उभारी देण्यासाठी काहीच दिलेले नाही. कठीण प्रसंगात सरकारने जनता असो वा लघुउद्योग असो बळ देण्याची गरज आहे. इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात कर जमा केला जातो. आम्ही देणारे आहोत, पण लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर अडचण निर्माण झाल्याने आम्ही सरकारकडे भिक नको तर मदत मागत आहोत. पण त्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर सातत्याने आंदोलने छेडावीच लागतील. या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करु, असेही आमदार आवाडे म्हणाले.
या रॅलीत बाळासाहेब कलागते, प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, प्रकाश मोरे, विलास गाताडे, सतिश कोष्टी, सौ. मौश्मी आवाडे, आदित्य आवाडे, दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, प्रा. शेखर शहा, प्रशांत कांबळे, नरसिंह पारीक, अविनाश कांबळे, राजगोंडा पाटील आदींसह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आवाडे समर्थक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *