इचलकरंजी ता. १०, अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल या लोकशाहीच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहावर सत्तेवर असलेल्या पण सत्तेवरून येत्या कांही दिवसात पायउतार होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी ज्या पद्धतीने हल्ला केला तो लोकशाही मूल्यावरचा अत्यंत निंदनीय हल्ला आहे. मात्र लोकशाही मार्गाने निवडून येऊन हुकूमशाही प्रस्थापित करू पाहणारी अशी मस्तवाल झुंडशाही आणि भांडवली साम्राज्यशाही फार काळ लोक सहन करत नाहीत हा इतिहास आहे.असे सत्तापिपासू प्रयत्न लोकशक्तीच मोडून काढत असते. अर्थात परिस्थिती चिंताजनक असली तरी लोकशाही मानणाऱ्या जगभरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी यामुळे वाढली आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आले. ‘अमेरिकेन लोकशाहीवरील हल्ला ‘ या विषयावर ही चर्चा आयोजित केली होती.या चर्चेत प्रसाद कुलकर्णी अशोक केसरकर, दयानंद लिपारे, तुकाराम अपराध, प्रा. रमेश लवटे, मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला व विषयाच्या विविध पैलूंची मांडणी केली.यावेळी ज्येष्ठ नेते व समाजवादी प्रबोधिनीचे हितचिंतक कालवश विलासकाका पाटील ( उंडाळकर ) यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चेत असे मत व्यक्त करण्यात आले की, गेल्या दशकभरामध्ये जगातील अनेक देशांमध्ये समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत , आपण मसीहा असल्याचे दाखवत , जमिनी वास्तवाचे प्रश्न सोडून भावनिक प्रश्न निर्माण करत काही नेते प्रस्थापित झालेले आहेत. ते लोकशाहीच्या सर्व आयुधांचा वापर करत त्या आधारे हुकूमशाही प्रस्थापित करत आहेत. हे तथाकथित स्वप्रतिमी मग्न नेते बहुसंख्याकवाद व संकुचित सांस्कृतिक राष्ट्रवाद यांची जोपासना करत आहेत. अशा मनमानी नेतृत्वामुळे त्या त्या देशाची आर्थिक ,सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे. आपला हाच पराभव लपवण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांच्याद्वारे लोकशाहीवर हल्ला करण्याचा बालिश प्रयत्न केला. मात्र जगभरच्या लोकशाहीवादी नागरिकांनी या घटनेपासून बोध घेतला पाहिजे. आणि आपण कोणाची तळी उचलत आहोत याचा विचार केला पाहिजे. तसेच असे विकृत सत्ताधीश निरनिराळ्या देशात प्रस्थापित होणे का जागतिक भांडवली षडयंत्राचा भाग असू शकतो. कारण असे सत्ताधीश निवडून येणे हा प्रकारही संशयास्पदरित्या जगभर वाढत आहे. ट्रम्प यांच्या चार वर्षांपूर्वीच्या विजयात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना असलेला रस आणि त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत केलेला सर्वांगीण हस्तक्षेप या गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत. निवडणूक यंत्रणा ते मत मोजणी या साऱ्याबाबत संशयी वातावरण जगभर का निर्माण होत आहे ? हा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही.यावेळी
पांडुरंग पिसे,बापूसाहेब भोसले,महालिंग कोळेकर,,नारायण लोटके,वसंतराव कोळेकर,शकील मुल्ला,संतोष शिंदे,शंकरराव भांबिष्ट्ये ,अशोक मानेआदींसह अनेकजण उपस्थित होते.