_कणकवली दूध योजनेची जागा “शासकीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावी_पर्यटन फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांची ना आदित्य ठाकरेंकडे मागणी

महाराष्ट्र


कणकवली : राज्य शासनाच्या दुग्धविकास खात्याच्या मालकीची वागदे -कणकवली येथील सुमारे 8 एकर आणि कोलगाव -सावंतवाडी येथील 2.5 एकर जागा दुध योजना बंद पडल्यामुळे गेली 7वर्षें विनावापर पडून आहे. शिवाय दुग्धव्यवसाय खात्याकडून   शासकीय दूध योजना पुन्हा कार्यान्वित होण्याची सुतराम शक्यता दिसत नसल्याने सदरील जागेचा वापर हा प्रायोगिक तत्वावर राज्य शासनाचे “शासकीय पर्यटन केंद्र ” म्हणून विकसित करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन फेडरेशन चे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला  “पर्यटन जिल्हा “म्हणून 1997 पासून अस्तित्वात आला असला तरी जिल्हयामध्ये शासनाचे कुठेही पर्यटन माहिती केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. जिल्हयामध्ये ओरोस येथे पर्यटन महामंडळाचे कार्यालय आणि मालवण -तारकर्ली व देवगड -कुणकेश्वर येथील पर्यटन महामंडळाची रिसॉर्ट वगळता राज्य शासनाचे कुठेही पर्यटन माहिती केंद्र स्थापन करण्यात आलेले नाही.
कणकवली शहरानजिक वागदे येथील जागा आणि सावंतवाडी शहरांनजीक कोलगाव येथील जागा या दोन्हीं जागा मुंबई -गोवा महामार्गा लगत असल्यामुळे पर्यटन केंद्र म्हणून विकसित केल्यास त्याचा लाभ शासनाला आणि जिल्ह्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांना होऊ शकेल. शिवाय दोन्हीं गावांच्या विकासासाठी होऊ शकेल असा विश्वास श्री. उपरकर यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील विविध पर्यटन स्थळांचा आणि जागांचा विकास नवीन संकल्पनाद्वारे करून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्यांदृष्टीने वागदे व कोलगाव येथे सरकारी पर्यटन माहिती केंद्रे सुरु करणे, तरुण -तरुणीना पर्यटक गाईड ट्रेनिंग देणें, सुरक्षा रक्षक ट्रेनिंग देणें, पर्यटकांसाठी वैद्यकीय सुविधा पुरविणे, गोवा राज्यात ये -जा करण्यासाठी तात्काळ प्रवासी वाहतूक परवाने देणें, पर्यटकांना निवास न्याहारीची सुविधा सवलतीच्या दरात पुरविणे, मसाज सेंटर सुरु करणे, पर्यटकांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारच्या सुविधा देता येतील. सिंधुदुर्ग जिल्हयातील शेकडो तरुण -तरुणीनी हॉटेल मॅनेजमेंट व टुरिस्ट गाईड सारखे कोर्सेस केले आहेत. अशा बेकारांना शासनाकडून रोजगार देता येईल.
कणकवली दूध योजनेच्या विस्तीर्ण जागेमध्ये योजनेची भव्य इमारत असून त्यावर टेरेस कव्हर केल्यास शासनाचे मेळावे, सभा, बैठका घेणे आणि इतर वेळी लग्न समारंभ हॉल म्हणून जागेचा भाडे तत्वावर वापर करता येईल. विश्रांती गृह, कर्मचारी निवासस्थाने, परिवहन विभाग यांचा वापर पर्यटकाना राहण्यासाठी करता येऊ शकेल. तसेच दिवसाला 5 टनी बर्फ कारखाना मत्स्यसंपदा योजनेतून पुनर्जिवीत केल्यास तो सुद्धा भाडेतत्वावर देता येईल. योजनेच्या मागील भागात नदीकिनारी जॅकवेल असून 50एचपी पंप व 40 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि 10 हजार मेगा व्याट क्षमतेचा विदयुत जनरेटर आणि हायटेन्शन    इलेक्ट्रिक सप्लाय एवढ्या सुविधा असल्यामुळे पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
तसेच येथे सद्या असलेली झाडे तशीच ठेऊन गार्डनची निर्मिती करणे शक्य आहे.
योजनेकडे सध्या 2 पहारेकरी असून उर्वरित 2 कर्मचारी हे मुख्यालय बदलीने वर्षभर रत्नागिरी येथील जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाच्या आस्थापनवरील आहेत.
सदरील प्रस्ताव आपण पालकमंत्री, आमदार, खासदार यांनाही देणार असून ना. आदित्य ठाकरे यांचेकडे पर्यटन व पर्यावरण खाते असल्यामुळे ते याबाबत धडाडीने निर्णय घेऊ शकतील असा विश्वास श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केला आहे.
*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *