हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा नामविस्तार

महाराष्ट्र

इचलकरंजी/प्रतिनिधी –
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा नामविस्तार करण्यास शनिवारी झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर कारखान्यात इथेनॉल निर्मितीला प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. इथेनॉल निर्मितीनंतर बाहेर पडणार्‍या स्पेंटवॉशमधून पोटॅश खत तयार करण्यात येणार आहे.

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासन नियमांचे पालन करुन ही सभा घेण्यात आली. सभेसाठी येणार्‍या प्रत्येक सभासदाचे थर्मल स्कॅनिंग करुन आत सोडले जात होते. सभास्थळी सोशल डिस्टन्सनुसारच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
स्वागत करुन प्रास्ताविकात कारखान्याचे चेअरमन, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, जवाहर साखर कारखाना आज देशपातळीवरील सर्वोत्कृष्ठ कारखान्यात गणला जात आहे.  सध्याची ऊसाची परिस्थिती, उद्योगात होत असलेले बदल या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करुन केवळ साखरेवर अवलंबून न राहता बायप्रॉडक्ट म्हणून त्यावर प्रक्रिया म्हणून काही तरी करावे व त्यातून सभासदांना काही लाभ मिळेल याचा विचार केला. त्यातूनच नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे प्रदुषणमुक्त असा इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा संकल्प केला आहे. जवाहर कारखाना म्हणजे एक कुटुंब असून कारखान्याने नेहमीच सभासदांच्य हिताचे निर्णय घेतले आहेत आणि भविष्यातही ते घेतले जातील असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक विलास गाताडे यांनी सर्वच शेतकरी सभासदांच्या विनंतीनुसार कारखान्याचा ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा नामविस्तार करण्याचा प्रस्ताव केला असून त्याला सर्वांनी एकमताने मंजूरी द्यावी, असे सांगितले. या नामविस्ताराला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूरी दर्शविली.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, जवाहर कारखाना हा शेतकर्‍यांचा कारखाना आहे. पण गतवर्षी महापूर आणि यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकर्‍यांसह कारखान्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील तीन वर्षे प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे कारखान्याने नुकसान सहन केले आहे. तब्बल 600 कोटी रुपयांचे नुकसान सोसून एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. नुकसानीचा अन्य कारखान्यांचा आकडा प्रतिटन 477 रुपये असला तरी कारखान्याचे कार्यकारी संचालक व त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनामुळे जवाहर कारखान्याचा आकडा कमी झाला आहे. आजवर कारखान्याने उच्चांकी दर दिला असून यापुढेही तो कायम असेल असे सांगतानाच पुढील वर्षी सर्व साखर कारखान्यांपेक्षा जवाहर कडून दिला जाणारा दर सर्वोच्च  असेल असे जाहीर केले.
टेक्निकल रिझल्टमध्ये जवाहर कारखाना देशातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा उत्कृष्ठ असल्याचे सांगून भविष्याचा विचार करता कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा संकल्प केला आहे. प्रतिदिन 1 लाख लिटर इथेनॉल निर्मितीला परवाना कारखान्याला मिळाला आहे. सव्वाशे कोटीच्या या प्रकल्पासाठी 97 कोटीचे कर्ज घेण्यास शासनाची मान्यता आहे. तर उर्वरीत 28 कोटी रुपये कारखान्याला उभारायचे आहेत. आसपासच्या गावांना आणि उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व काळजी घेऊन प्रदुषणमुक्त असा हा प्रकल्प असणार आहे. इथेनॉल निर्मितीनंतर बाहेर पडणार्‍या स्पेंटवॉशमधून पोटॅश खत तयार करण्यात येणार असून ते शेतकर्‍यांना पुरविले जाणार आहे. अशाप्रकारे प्रकल्प उभारणारा जवाहर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरेल, असे ते म्हणाले. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद शेतकर्‍यांनी नोंदणी केलेला 100 टक्के ऊस कारखान्याला पाठविला तर यंदा 20 लाखापेक्षा अधिक ऊसाचे गाळप निश्‍चितपणे होईल, असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखविला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांनी उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. आभार कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी चेअरमन उत्तम आवाडे, केन कमिटी चेअरमन राहुल आवाडे,  प्रकाशराव सातपुते, स्वप्निल आवाडे,  प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सुनिल पाटील, राजेश पाटील आदींसह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *