इचलकरंजीत घरोघरी पाइपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस वितरण योजनेचा शुभारंभ

महाराष्ट्र राजकीय

इचलकरंजी/प्रतिनिधी –
केंद्र सरकारच्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन स्कीम अंतर्गत वस्त्रनगरी इचलकरंजीत घरोघरी पाइपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस वितरण योजनेचा शुभारंभ शनिवारी येथील थोरात चौक परिसरात करण्यात आला. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 15 हजार गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.
इचलकरंजी शहराला एच.पी. आईल गॅस ही कंपनी पाइपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करणार आहे. या योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ थोरात चौक येथे खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार धैर्यशील माने यांनी, नैसर्गिक गॅस वितरण योजना ही अत्यंत महत्वाची योजना असून नागरिकांना 24 तास अखंडीतपणे गॅस मिळणार आहे. त्याचबरोबर उद्योगांनाही गॅस पुरवठा केला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पाइपलाईनची गरज नसल्याचे सांगितले. इचलकरंजी लवकरच सिलेंडरमुक्त होणार असून नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा विकास होत असल्याने सर्वांनी मिळून एकदिलाचे इर्षेपेक्षा सकारात्मक राजकारण करुया, असे आवाहन केले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, या प्रश्‍नी आपणही मागील दहा वर्षापासून पाठपुरावा करत असल्याचे सांगत या योजनेचा लाभ शहरातील सर्वच मिळकतधारकांना मिळाला पाहिजे. केंद्र शासनाने घर तेथे गॅस ही योजना सुरु केली असून त्यानुसार या योजनेतून नागरीक आणि उद्योगासाठीही गॅस पुरवठा करण्यासाठी कंपनीने नियोजन करण्याची मागणी केली. नगरपरिषदेत सुरु असलेल्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आपण नगरपरिषदेतून मुक्त होण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, थेट पाइपलाईन योजनेमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पर्यावरणाची हाणी टाळणारी ही महत्वाकांक्षी योजना निश्‍चित कालावधीप्रमाणे वेळेत पूर्ण करावी असे सांगत दुसर्‍या टप्प्यात शहरातील उद्योगांनाही या गॅसचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी रविंद्र माने, सुनिल पाटील, मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, दिलीप मुथा, किसन शिंदे, भाऊसो आवळे, रविंद्र लोहार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *