यड्राव गावाला वेठीस धरणार्‍या महिलेवर कारवाईची मागणी ; अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना ग्रामस्थांचे निवेदन

क्राइम

इचलकरंजी/प्रतिनिधी –
शालेय पोषण आहाराचा ठेका रद्द केल्याच्या रागातून वैयक्तिक स्वार्थापोटी ग्रामशिक्षण समिती व शिक्षक यांना वेठीस धरून हेतू पुरस्सर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचा प्रकार संबंधित गटाच्या प्रवर्तक सौ. अफसाना देसाई यांच्याकडून होत आहे. गावाला वेठीस धरणार्‍या या महिलेवर कायदेशीर कारवाई करून शाळेची व गावची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य थांबवावे, अशा मागणीचे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. त्यावर सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन सौ. गायकवाड यांनी ग्रामस्थांना दिले.
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील कन्या विद्यामंदिर मध्ये वेळेत अर्ज न आल्याने व पालक , विद्यार्थिनींच्या तक्रारीमुळे केजीएन महिला बचत गटाचा पोषण आहाराचा ठेका शालेय व्यवस्थापन समितीने रद्द केला आहे. पोषण आहारातील अनियमितता आहारामध्ये केस, खडे सापडणे. वेळेत पोषण आहार न देणे, बेचव पोषण आहार, धान्य नीट न निवडतात शिजवणे, मेनू कार्ड नुसार पोषण आहार न देणे, विद्यार्थ्यांना उद्धट बोलणे, शिक्षकांना दमदाटी करणे अशा तक्रारी होत्या. याबाबत वेळोवेळी तोंडी सूचना करून देखील त्यांच्या वर्तणुकीत कोणताच बदल झाला नाही. यामुळे समितीने नियमानुसार अर्ज मागविले. यावेळी केजीएन बचत गटाचा अर्ज वेळेत न आल्याने त्यांचा ठेका रद्द करून दुसर्‍या गटाला देण्यात आला. या रागातून अफसाना देसाई यांनी शिक्षकांवर व समितीतील सदस्यांवर अदखलपात्र व दखलपात्र तक्रारी शहापूर पोलीस ठाण्यात दिले आहेत. त्यामुळे समितीतील सदस्य व शिक्षकांची मानसिकता बिघडून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर महिला यापुढेही सर्व व्यवस्थापन कमिटी सदस्य पदाधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करणे बाबत धमकी देत आहे. व शिवीगाळ करत आहे. केजीएन बचत गट हा बेकायदेशीर असून त्याची पंचायत समिती शिरोळ व ग्रामपंचायत यांच्याकडे कोणतीही रितसर नोंदणी नाही. असे असताना सदर बचत गट बेकायदेशीर स्थापन करून शासनाची, व्यवस्थापन समितीची व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. यामुळे अशा खुनशी प्रवृत्तीच्या व गावाला वेठीस धरणार्‍या महिलेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदरचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांना देण्यात आले. व महिलेकडून होणार्‍या त्रासाची माहिती सांगण्यात आली. यावेळी अधिकार्‍यांनी चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
निवेदनावर 170 नागरिकांच्या सह्या आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, शिरोळ पं.स.चे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, माजी सरपंच सरदार सुतार, उषा तासगावे, सुमन झुटाळ, माजी उपसरपंच शिवाजी दळवी, सकल मराठा संघटनेचे केशव धुमाळे, शेतकरी संघटनेचे अभिजीत उपाध्ये, आरपीआयचे  रंगराव कांबळे, महेश निर्मळ, दीपक झुटाळ, तसेच कन्या विद्यामंदिर चे शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *