पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना निवडणूकीत मताधिक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरेल – ए. वाय. पाटील

कोल्हापूर


इचलकरंजी/प्रतिनिधी –
आजवर ज्यांना निवडून दिले त्यांनी समस्या सोडविण्याऐवजी वाढविल्या आहेत.   या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करतील. आणि या मताधिक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरेल, असा विश्‍वास कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील पदवीधर, शिक्षक व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील महेश क्लब येथे पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ए. वाय. पाटील म्हणाले, शिक्षक आणि पदवीधरांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. मागील सहा वर्षात भाजपाने केेलेल्या वल्गना फोल ठरल्या असून देण्याऐवजी जे होते ते हिरावून घेतले आहे. पण आता त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया. जिल्ह्यात 14400 पदवीधर मतदार असून त्यामध्ये इचलकरंजीत 5300 मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयात इचलकरंजी पहिल्या क्रमांकावर असेल. तर हातकणंगले तालुक्यात 2318 शिक्षक मतदार असून त्यांचीही साथ मिळून प्रा. आसगांवकर आणि लाड हे निश्‍चितपणे विजयी होतील असे सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर आणि अरुण लाड यांनी,   आपली भूमिका स्पष्ट करतानाच मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, नगरसेवक शशांक बावचकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, जयकुमार कोले, खंडेराव जगदाळे, विनायक सपाटे आदींची भाषणे झाली. स्वागत काँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे यांनी केले. प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे यांनी महाविकास आघाडी सरकार व उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला.
   या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, मलकारी लवटे, मंगेश कांबुरे, सुभाष मालपाणी, बाळासाहेब देशमुख, बाबा पाटील, दादा लाड, सौ. माधुरी चव्हाण, सौ. शुभांगी माळी, सौ. दीपाली बेडक्याळे, सौ. सुनिता शेळके, सौ. मीना बेडगे आदींसह शिक्षक, पदवीधर व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार यासीन मुजावर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *