जवाहर कारखान्याकडून एफआरपी एकरकमी अदा

कोल्हापूरइचलकरंजी/प्रतिनिधी –
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 हा 28 वा ऊस गाळप हंगाम शुक्रवार, दिनांक 30 ऑक्टोबर,2020 रोजी पासून सुरु झाला. या हंगामात पहिल्या पंधरवड्यामध्ये शेतकर्‍यांकडून गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची विनाकपात प्रतीटन 2800 रुपयेप्रमाणे होणारी एफआरपीची रक्कम एकरकमी संबंधित ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या आणि ऊस तोडणी वाहतुक बिलाची रक्कम तोडणी वाहतुक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, संचालक आमदार प्रकाश आवाडे आणि केन कमिटी चेअरमन राहुल आवाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना एफआरपी ची रक्कम एकरकमी आणि विनाकपात देणारा जवाहर हा महाराष्ट्रातील पहिला कारखाना ठरला आहे.
सन 2019 मधील महापूर आणि यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकला गेला नसल्याने शेतकर्‍यांचे खुप नुकसान झाले आहे. अशातच अलिकडे काही दिवसापर्यंत अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कच्च्या घाती आणि कोरोनाच्या भितीमुळे ऊस तोडणी मजूरांची कमतरता या अडचणींमुळे कारखाने यंदा उशीराने सूरु झाले.
जवाहर कारखान्याने सभासद व शेतकर्‍यांच्या विश्‍वासावर आतापर्यंत 27 ऊस गाळप हंगाम यशस्विपणे पार पाडले आहेत आणि कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्‍यांप्रती नेहमी सहकार्य व मदतीची भावना जोपासली आहे. कारखान्याने कोणत्याही शासकीय अथवा वित्त संस्थेची तसेच शेतकरी, कामगार यांची रक्कम थकीत ठेवलेली नाही. तेंव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्‍यांनी चालू गाळप हंगामात आपला नोंदीतील संपूर्ण ऊस जवाहरकडेच गाळपास पाठवून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *