चोरट्यांनी बंद घरात घुसून 20 हजाराच्या रोकडसह 1 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

कोल्हापूर क्राइम

इचलकरंजी/प्रतिनिधी –
बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून तेथील पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात घुसून चोरट्यांनी 20 हजाराच्या रोकडसह 1 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जवाहरनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मल्लिकार्जुन चंद्रशेखर गंजार (वय 26) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी मल्लिकार्जुन गंजार हा आई, वडील व भावासमवेत जवाहरनगर परिसरातील सरोजिनी हॉस्पिटल लगत राहण्यास आहे. चार दिवसापूर्वी गंजार याचे आई-वडील व भाऊ कर्नाटकातील बनट्टी गावी नातेवाईकांकडे गेले होते. तर मल्लिकार्जुन हा 17 नोव्हेंबर रोजी गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेला होता. 18 नोव्हेंबर रोजी गणपतीपुळे येथून परतल्यानंतर तो रात्री मित्राच्या घरीच राहिला होता. 19 रोजी सकाळच्या सुमारास मल्लिकार्जुन याच्या आईने फोनवरुन शेजारी राहणार्‍या दुंडाप्पा यांचे घराचे कुलूप तोडल्याचे सांगत त्याठिकाणी जावून माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार मल्लिकार्जुन याने घटनास्थळी जावून पाहिले असता दुंडाप्पा यांच्या घरातील काहीच साहित्य चोरीस गेले नसल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या पोटमाळ्यावरुन चोरटे आपल्या घरात गेल्याचा संशय आल्याने मल्लिाकार्जुन याने आपल्या घराचा दरवाजा उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील 20 हजार रुपयांची रोकड, 60 हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची चेन, 30 हजार रुपये किंमतीची पाऊण तोळ्याची बोरमाळ, 16 हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे लहान मणी आणि 16 हजार रुपयांचे चार ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *