बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली ;सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर क्राइम

इचलकरंजी/प्रतिनिधी –
बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली. या प्रकरणी अमोल अरुण लोळगे (वय 40 रा. वाणी पेठ, पेठवडगांव) याला अटक केली. शेळके मळा ते लिंबू चौक या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध कंपन्यांचा 2 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा, मोटार आदींसह सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर पोलिसांकडून शेळके मळा ते लिंबू चौक परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी होंडा सिटी (क्र. एमएच 09 झेड 4747) ही गाडी संशयितरित्या जाताना दिसली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन ही गाडी पकडली. चालक अमोल लोळगे याला ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असा मुद्देमाल असल्याचे निदर्शनास आले. शासनाने प्रतिबंधित केलेला आरएमडी पानमसाला, विमल पानमसाला, मुसाफिर, कोल्हापूरी पानमसाला असा विविध कंपन्याचा 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 3 लाख रुपयांची होंडा सिटी कार मिळून 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक इश्‍वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, विजय माळवदे, गजानन बरगाले आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *