इचलकरंजी/प्रतिनिधी –
संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या कोविड महामारीच्या संकटामुळे यावर्षी पंचगंगा नदी घाटावर साजरी करण्यात येणार्या छटपुजेसाठी शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी छटपुजा आपापल्या घरीच साजरी करावी असे आवाहन उत्तर भारतीय जनसेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी उत्तर भारतीयांच्यात सुर्यषष्ठी व्रत व छट पुजा साजरी केली केली जाते. या पुजेसाठी पंचगंगा नदीघाटासह सार्वजनिक तलावाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यंदा उद्भवलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच दिवाळी उत्सव आणि हिवाळा लक्षात घेता कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आणि 21 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास छटपुजा होणार आहे. त्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासह खबरदारी म्हणून इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाटासह सार्वजनिक ठिकाणी छटपुजा करण्यास प्रशासनाच्यावतीने मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उत्तर भारतीय समाजबांधवांनी हे कार्यक्रम आपापल्या घरीच करावेत. छटमातेचे पुजन करुन कोरोना महामारीच्या संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना करावी असे आवाहन जनसेवा संघाच्या विवेक पांडे, अर्जुन सहानी, रामायण मिश्रा, हिराराम तिवारी, जयप्रकाश तिवारी, जगदीश सिंह, सत्यनारायण चंद्रवंशी, संतोष कुशवाह आदींनी केले आहे.
पंचगंगा नदी घाट येथे छट पुजेस बंदी
दरम्यान, कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी होणार्या सामुहिक छटपुजेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरांमध्ये सामूहिक छटपुजेस बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी घाटावर होणार्या सामुहीक छटपुजेस बंदी घालण्यात आली असून सदर आदेशाचे सर्व संबंधितांनी पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
