मौजे बाळेघोलच्या जमिनी श्रीमंत क्षात्र जगदगुरु, पीठ पाटगाव यांच्या बंधनातून मुक्त : सुमारे एक हजार खातेदारांना होणार लाभ

कोल्हापूर

मौजे बाळेघोलच्या जमिनी श्रीमंत क्षात्र जगदगुरु, पीठ पाटगाव यांच्या
बंधनातून मुक्त : सुमारे एक हजार खातेदारांना होणार लााभ -जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा निर्णय
कोल्हापूर, दि. कागल तालुक्यातील मौजै बाळेघोल येथील गट क्रमांक 1206 जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरुन श्रीमंत क्षात्र जगदगुरु, पीठ पाटगांव पीठाचे नाव कब्जेदार सदरातून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा लाभ सुमारे एक हजार खातेदारांना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मौजे बाळेघोल ता. कागल हे गाव तत्कालीन संस्थांनिकांनी सुमारे 315 वर्षापूर्वी पीठ पाटगांव मठाचे अन्नोदकासाठी देशमुखी इनाम म्हणून दिले होते. या गावचे जमिनीच्या 7/12 उताऱ्यास सद्यस्थितीत श्रीमंत क्षात्र जगदगुरु मौनी महाराज संस्थान, पीठ पाटगांव ट्रस्ट यांचे नावाची कब्जेदार सदरी नोंद आहे. परंतु, सन 1920 ते 1932 च्या दरम्यानचे या गावाचे फिल्ड बुक व हिस्सा नमुना नंबर 12 या महसुली अभिलेखाची तपासणी केली असता, सदरच्या जमिनी श्रीमंत क्षात्र जगदगुरु मौनी महाराज संस्थान, पीठ पाटगांव ट्रस्टच्या मालकीच्या नसून खाजगी व्यक्तींच्या आहेत. परंतु, 1953-56 चे दरम्यान तत्कालिन गावकामगार तलाठी यांनी या जमिनीस श्रीमंत क्षात्र जगदगुरु पीठ पाटगांव ट्रस्टचे नाव मुळ कब्जेदारांच्या नावा समवेत रेघेच्या वर कोणत्याही फेरफारा शिवाय स्वत:चे अधिकारात नोंदले होते.
याबाबत खातेदारांनी वर्षानुवर्षे महसूल विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या. या जमिनी पीठाच्या मालकीच्या नसल्यामुळे व त्या खासगी मालकीच्या असल्यामुळे पीठाचे नावाची नोंद कमी करण्याबाबत विनंती केली होती. यासाठी पुन्हा बाळेघोल येथील एकूण 84 खातेदारांनी तहसिलदार कागल यांच्याकडे अर्ज करुन पीठाचे नाव 7/12 उताऱ्यावरुन कमी करण्याची विनंती केली. त्यास अनुसुरुन तहसिलदार, कागल यांनी जुने अभिलेख तपासून वरील अभिलेखासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता. त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना नोटीसा देवून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये तत्कालीन गावकामगार तलाठी यांनी स्वत:चे हस्ताक्षरात श्रीमंत क्षात्र जगदगुरु पीठ यांचे नांव 7/12 उताऱ्यावर नोंदविण्याची केलेली चुक दुरुस्त केलेली आहे. त्यानुसार पीठाचे नाव 7/12 उताऱ्याचे कब्जेदार सदरातून कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या आदेशाचा अंमल बाळेघोल येथील एकूण गट क्रमांकाच्या 1206 जमिनीस होणार असून त्याचे क्षेत्र एकर 3,407.5 असून त्याचा लाभ अंदाजे 1,000 खातेदारांना होणार आहे. श्रीमंत क्षात्र जगदगुरु मौनी महाराज संस्थान, पीठ पाटगांव यांना या जमिनींचे महसूल उत्पन्न / सारा देशमुखी म्हणून घेण्याचा अधिकार असताना त्यांचे नाव तलाठी यांच्या चुकीने कब्जेदार सदरी दाखल झाल्यामुळे खातेदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामध्ये जमिनीवर कर्ज काढणे, वारस नोंद करणे, जमिनीचे हस्तांतरण करणे इत्यादींचा अंतर्भाव आहे. प्रत्येक वेळी या खातेदारांना याकरीता श्रीमंत क्षात्र जगदगुरु मौनी महाराज संस्थान, पीठ पाटगांव यांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत असे व त्यानंतर त्यांना या जमिनीबाबत कोणताही व्यवहार करता येत असत. श्रीमंत क्षात्र जगदगुरु मौनी महाराज संस्थान, पीठ पाटगांव यांना देखील बाळेघोल येथील जमिनीवर त्यांची मालकी नसल्याचे मान्य आहे. या जमिनीची नोंद ट्रस्टचे मालमत्ता नोंदवहीस देखील नाही. परंतु, महसूली अभिलेखात झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी खातेदारांना 67 वर्षे वाट पहावी लागली. परंतु, आता ही चुक दुरुस्त झाल्याने खातेदारांना येणाऱ्या अडचणीतून मुक्तता मिळाली आहे व या जमिनी श्रीमंत क्षात्र जगतगुरु पीठाचे बंधनातून मुक्त झाल्या आहेत. मुळ सनदेप्रमाणे पीठ पाटगांव यांचा फक्त महसुली उत्पन्नाचा साऱ्याचा हक्क, मुंबई मर्ज्ड टेरिटोरिज आणि एरियाज (जागीर) ऍ़बॉलिशन कायदा, 1953 अन्वये जागीर / देशमुखी इनाम खालसा झाली असल्याने, या कायद्याच्या अधिन राहणार आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशाची अंमलबजावणी अपिल कालावधीनंतर करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *