राज्यातील 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापराची बिले अंदाजापेक्षा जास्त; ग्राकातून तीव्र नाराजी

कोल्हापूर महाराष्ट्र राजकीय

इचलकरंजी | राज्यातील अंदाजे 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांतील वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण नैसर्गिक असून मार्च ते जून पूर्णपणे उन्हाळा कालावधी आणि लॉकडाऊन मुळे कुटुंबातील सर्वजण घरात. त्यामुळे सर्व खोल्या मधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू असल्यामुळे वीज वापर वाढला आहे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून झालेली दरवाढ. 1 एप्रिल नंतर हे पहिलेच बिल आहे आणि आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण दरवाढ माहितीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात असंतोष, राग व नाराजी प्रकट करायला हवी, अशी माहिती वीजतज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
वीज बिलांतील स्थिर आकार पूर्वी दरमहा 90 रुपये होता, तो आता 100 रुपये झालेला आहे. वहन आकार पूर्वी 1.28 रु. प्रति युनिट होता, तो आता 1.45 रु. प्रति युनिट झाला आहे. वीज आकार पहिल्या 100 युनिटससाठी पूर्वी 3.05 रु. प्रति युनिट होता, तो आता 3.46 रु. प्रति युनिट झालेला आहे. 100 युनिटस च्या पुढील 101 ते 300 युनिटस पर्यंतचा दर पूर्वी 6.95 रु. प्रति युनिट होता, तो आता 7.43 रु. प्रति युनिट झालेला आहे. 300 युनिटस च्या पुढील 301 ते 500 युनिटस पर्यंतचा दर पूर्वी 9.90 रु. प्रति युनिट होता, तो आता 10.32 रु प्रति युनिट झालेला आहे. स्थिर आकार, वहन आकार व वीज आकार ही एकूण वाढ 100 युनिटसच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी 16% आहे व 100 युनिटसच्या वरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ 13% आहे. आणि या वाढीव वीज दराने ग्राहकांना प्रथमच बिले आलेली आहेत
मुळात 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालेला असतानाही महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. 1 एप्रिल पासून नवीन वीजदर लागू होतील असे जाहीर केले.
एप्रिल व मे या दोन महिन्यात महावितरण कंपनीने ऑनलाईन बिले केली. तीही कमी सरासरीने केली. बहुतांशी ग्राहकांनी ती पाहीली नाहीत व भरलीही नाहीत. ज्यांनी भरली आहेत, त्यांची भरलेली रक्कम वजा झालेली आहे. ज्यांनी भरली नाहीत, त्यांच्या बिलांत ती रक्कम थकबाकी म्हणून आलेली आहे. महावितरण कंपनीच्या बिलांचा मुख्य कार्यालयाचा सॉफ्टवेअर प्रोग्राम बरोबर आहे. स्थानिक कार्यालय फक्त मीटर रीडिंगचा आकडा व रीडिंगची तारीख देते वा ग्राहक क्रमांकानुसार माहिती भरते. यामध्ये कांही चूक झाली, तर चुकीचे बिल येऊ शकते. अशीही कांही बिले झालेली आहेत, पण अशा बिलांचे प्रमाण अल्प आहे. अशा ग्राहकांना लेखी तक्रार नोंद करून बिले दुरुस्त करून घ्यावी लागतील, अशीही माहिती होगाडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *