वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांची आत्महत्या नसून खून – प्रकाश आंबेडकर

क्राइम महाराष्ट्र

दलित संघटना संतप्त, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर : काही दिवसांपूर्वी काटोल पोलीस ठाण्यांतर्गत एका दलित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणावरून आता दलित संघटना संतप्त झाल्या असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या तरुणाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भातील सबळ पुरावे असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अरविंद बन्सोड (३२) रा. काटोल असे मृताचे नाव असून तो वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अरविंद आणि त्याचा मित्र गजानन राऊत हे २७ मे रोजी थडीपवनी येथे गेले होते.

येथे अरविंद आणि पंचायत समिती सदस्य मयूर ऊर्फ मिथिलेश उमरकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी अरविंदने गजानन याला दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पाठवले होते. यावेळी जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून अरविंदने कीटकनाशक प्राशन केले. मिथिलेशने आपल्या साथीदारांच्या मदतीने गाडीतून अरविंदला प्रथम जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला काटोल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले व त्यानंतर नागपूरला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा २८ मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मयूरविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. मयूर हा राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख बंडोपंत उमरीकर यांचा मुलगा आहे. पण, ही आत्महत्या नसून खून असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडली असून सबळ पुरावे आहेत. आपल्या कार्यकर्त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधला असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा. मृताच्या कुटुंबीयांना संरक्षण प्रदान करण्यात यावे. अरविंदच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

‘अ‍ॅट्रॉसिटी’चे कलम वाढवले

अरविंद रुग्णालयात दाखल असताना त्याचा जबाब नोंदवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने जबाब नोंदवता आला नाही. आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या जबाबावरून हा खुनाचा प्रकार दिसून येत नाही. शवविच्छेदन अहवालामध्येही कुठेही मारहाण झाल्याच्या, खून करण्यात आल्याच्या खुणा नाहीत. गुन्ह्य़ात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले असून तपास उपविभागीय पोलीस अधीकारी नागेश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

– राकेश ओला, पोलीस अधीक्षक.

भीम आर्मीची मागणी

या घटनेतील आरोपी मयूर याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीने केली होती. त्याकरिता नागपूर ग्रामीण अध्यक्ष अजय भिमटे, मुकेश खडतकर, आस्तिक बागडे, हरीश रामटेके, अमोल चिमनकर, नरेंद्र शेंडे, विक्की पाटील यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *