मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा- प्रकाश आंबेडकर

देश-विदेश

कोरोनाच्या संकट काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एवढेच नाही तर मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस कोरोन्टाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. याला मोदी सरकार जबाबदार असून कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे, तर गरिबाला अजून गरीब कसे करता येईल हे covid-19 मध्ये व्यवस्थित करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. त्याचबरोबर ग्रामीण भागासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे होत्या.

पण ग्रामीण भागात सरकार दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही मुद्यांचे पत्र पाठवले होते, ते पत्र संबंधित विभागाला दिल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्यापही कुठेच झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *