बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी तेलनाडे विरोधी तक्रारदार नरेंद्र भोरेला अटक, नगरसेविकाचा पती सदानंद दळवाई याच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर क्रीडा

तेलनाडे बंधूंच्या विरोधात तक्रार दाखल केलेल्या नरेंद्र सुरेश भोरे (वय ४१ रा. सांगली नाका) याला बेकायदेशीरपणे गुटख्याच्या वाहतूक प्रकरणी गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. तर नगरसेविकाचा पती सदानंद दळवाई याच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांचा ५९ हजार ५०० रुपयांचा गुटखा व ६ लाख रुपयांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नरेंद्र भोरे हा हर्षल मालगांवे याच्या मालकीची कार (स्विफ्ट डिझायर) घेऊन गुटखा आणण्यासाठी गेला होता. भोरे याने माणकापूर येथून सॅनिटायझर आणायचे असे सांगून अंगरक्षक पोलिस विशाल खाडे याला सोबत घेतले होते.

पंचगंगा नदी पुलाच्या पलिकडे गेल्यानंतर भोरे याने खाडे याला गाडीतून उतरवून तेथेच थांबण्यास सांगितले. दरम्यान भोरे हा गुटखा घेऊन येत असल्याची माहिती खाडे याला मिळाल्यानंतर त्याने या संदर्भातील माहिती पंचगंगा नदी परिसरातील तपासणी नाक्यावर कळवली. माणकापूर येथून परतत असताना भोरे याने खाडे याला पुन्हा गाडीत घेतले. ते तपासणी नाक्यावर आले असताना पोलिसांनी गाडी अडवून संपूर्ण तपासणी केली. त्यावेळी गाडीच्या मागील बाजूच्या डिकीत व सीटखाली बेकायदेशीरित्या गुटखा ठेवण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी हा साठा जप्त करत भोरे याच्याकडे चौकशी केली असता, हा गुटखा शिरदवाड नजीक कर्नाटक हद्दीतून जावेद चोकावे याच्याकडून आणल्याचे उघडकीस आले.

तसेच यापूर्वी साडेतीन हजारांचा गुटखा आणल्याची भोरे याने कबुली पोलिसांसमोर दिली. कर्नाटकातून आणलेला हा गुटखा तो दळवाई बंधूंच्या हाती सोपविणार होता. मोबाईल कॉल्सवरुन दळवाई बंधूंचा भोरे याच्याशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी भोरे याला ताब्यात घेतले असून सदानंद दळवाई, दत्तात्रय दळवाई, गजानन दळवाई, नरेंद्र भोरे, गाडी मालक हर्षल मालगांवे, जावेद चोकावे आणि गुंड्या उर्फ मुसा जमादार अशा सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नरेंद्र भोरे याला अटक करण्यात आली असून भोरे व दळवाई यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास सपोनि गजेंद्र लोहार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *