तिरुपती बालाजी मंदिराकडे पगाराचे पैसै नाही…लॉकडाऊनचा फटका मंदिरांच्या अर्थव्यवस्थेला

अध्यात्मिक देश-विदेश

लॉकडाऊनचा फटका मंदिरांच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचे चित्र आहे. जगात सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थान प्रशासनाकडे कर्मचाऱ्याचे वेतन देण्यासाठी आणि इतर खर्चासाठी पैसै नाहीत. लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद ठेवल्यामुळे भक्तांकडून देणगीस्वरुपात मिळणाऱ्या 400 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे, त्यामुळे देवस्थान समितीला पैशाची चणचण सुरु झाल्याचे समिती प्रशासनाने म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भक्तांकडून देणगी मिळाल्या नाहीत. गेल्या महिन्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चापोटी मंदिर प्रशासनाने 300 कोटी रुपये खर्च केले. या महिन्याचे वेतन आणि इतर खर्च कसा भागवावा हा प्रश्न आता देवस्थान समितीसमोर आहे.

उत्पन्न आटले
मंदिर प्रशासनाला महिन्याचे 200 कोटी रुपये उत्पन्न मिळते. दिवसाला 80 हजार ते एक लाख लोक दर्शनाला येतात. सण, उस्तवाच्या काळात भक्तांची संख्या जास्त असते. मात्र 20 मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. दर्शन पासेसची विक्री बंद झाली आहे. प्रसाद, देणगी आणि निवासाच्या व्यवस्थेतून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले आहे.

वार्षिक तेराशे कोटीचा खर्च
तिरुपती देवस्थान कर्मचाऱ्यांचे वेतन, पेंशन देण्यासाठी महिन्याकाठी 120 कोटी रुपये खर्च करते. 2020-21 या वर्षी वेतन आणि इतर खर्चासाठी देवस्थान प्रशासनाने 1385 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. शिवाय मदिर प्रशासन चालवत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांसाठी 400 कोटी रुपयाचा खर्च येतो. सध्या मंदिराकडे जवळपास 8 टन सोने आणि 14 हजार कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझीट आहे. अनेक भक्तांकडून देणगीस्वरुपात मंदिराला हे सोने आणि रोख रक्कम मिळाली आहे. मात्र या सोन्याला हात न लावता वेतन आणि इतर खर्च कसा भागवता येईल यावर तोडगा काढण्याचे काम सुरु असल्याचे देवस्थान प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *