कोल्हापूरला खरी धास्ती चार मेपासून पण का? वाचा

कोल्हापूर महाराष्ट्र राजकीय

कोरोनाच्या धास्तीने गड्या आपल्या गाव बरा म्हणत, अधिकृतरीत्या सुमारे 90 हजार लोकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आता अटी, शर्थींसह जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून बाहेर जाण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर अडकून पडलेले लोक गावाकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. हे लोक चार मेपासून जिल्ह्यात येणार आहेत. 

मागील 40 दिवसांत काटेकोर लॉकडाउनचे पालन करण्यात आले. आता बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा धोका वाढू नये, अशी काळजी नागरिकांसह जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला घ्यावी लागणार आहे. 

देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात 25 मार्च ते 14 एप्रिल या काळात लॉकडाउन जाहीर केले. दुसऱ्या टप्प्यात 15 एप्रिल ते 3 मे या कालावावधीत पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात 3 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाउन वाढवले आहे. पहिल्या दोन टप्प्यात जाहीर लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली, मात्र तिसऱ्या टप्प्यात अनेक अटी शिथिल केल्या आहेत. कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी आदींना त्यांच्या-त्यांच्या मूळ गावी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्याही आता लक्षणीय राहणार आहे. 

जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर किंवा जिल्ह्यातून बाहेर जायचे असल्यास ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. गेल्या 24 तासात एक, दोन नव्हे तर तब्बल 16 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये बहुतांश चाकरमान्यांचा समावेश आहे. यापूर्वीच जिल्ह्यात अधिकृतरीत्या 90 हजार लोक आले आहेत. अनधिकृत लोकांची संख्याही काही हजारांत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अजूनही चोर मार्गांचा वापर करून लोक जिल्ह्यात येतच आहेत. चार मेपासून तर शासनानेच अटी, शर्थींवर लोकांना ये-जा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे चाकरमानी, कामगार, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण आदींना गावाकडची ओढ लागली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *