३ मे नंतर काय काय सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी दिलेत ‘हे’ संकेत

महाराष्ट्र राजकीय

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोनमध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतू ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोन मधील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

आज मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुताम्यांचे स्मरण होते, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र लढवैय्या महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. अनेक राज्यकर्ते, क्रांतीकारक, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. रुढी परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतीबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा ६० वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करावयाचा होता परंतू आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे,  काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता, आज त्यांच्यासह सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते. आज मला माझ्या आईची “म”ची देखील आठवण येते. 

परराज्यातील लोकांना पाठवण्याची शिस्तबद्ध योजना, गर्दी नको

परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेल्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतू त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने  जमा होऊ नका हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *