बाहेर गावी जायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा! सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर राजकीय

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी कामानिमित्त घरापासून दूर असणारे अनेक लोक (विस्थापित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व अन्य लोक) आपल्या घरांपासून, राज्यापासून दूर अडकून पडले आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या सूचनांनुसार राज्य  शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली  आहे.

 ज्या लोकांना आपण राहत असलेल्या ठिकाणांहून दुसरीकडे जायचे असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण कोठे जाणार आहोत व तत्सम माहिती याची नोंद करायची आहे. यासंदर्भात आवश्यकता वाटल्यास लोकांनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातून  बाहेर जाणाऱ्या  लोकांची जिल्हावार यादी तयार करणार आहेत. हे  जिल्हाधिकारी  त्यांनी तयार केलेली  ही यादी इतर संबंधित  जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत. परराज्यातील लोकांच्या प्रवासाबाबत  दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन याचं पत्र असल्याशिवाय कोणालाही स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. यानुसार जे लोक  प्रवास करणार आहेत,  त्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यांच्यात लक्षण नसतील तरच  त्यांना प्रवास करता येणार आहे. संबंधित व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली  तर त्या  व्यक्तीस वैद्यकीय उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या परवानगी  पत्रात संबंधित व्यक्तीस कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही, हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक आहे.

स्थलांतर करणारी व्यक्ती स्वत:च्या वाहनाने प्रवास करणार असेल तर त्यांच्याकडे पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या जिल्ह्यांची / राज्यांची संमती पत्रे असणं आवश्यक आहे. लोकांना  घेऊन जाणाऱ्या वाहनांकडेही पाठविणाऱ्या राज्याचा/ जिल्ह्याचा  ट्रान्झीट पास असणं आवश्यक आहे. या पासवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे, प्रवासाचा रूट , कालावधी, प्रवासाची तारीख असणंही बंधनकारक आहे. हा पासच  नमूद प्रवासासाठीच सर्व शासकीय यंत्रणांकडून ग्राह्य धरला जाईल. स्थलांतरीत होणारे प्रवासी ज्या-ज्या ठिकाणी उतरणार आहेत, त्याबाबतची यादी संबंधित राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. प्रवाशांची वाहतुक ज्या वाहनांमधून करण्यात येणार आहे, ती वाहने सॅनिटायझर वापरून निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रवाशी बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. 

 महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व प्रवाशांची सर्वात आधी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तर प्रवास करून आलेल्या व्यक्तीचा फॉलोअप स्थानिक आरोग्य विभाग ठेवणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला घरात क्वॉरंटाइन करायचे की, संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवायचे याबाबतचा निर्णयही स्थानिक आरोग्य विभाग घेणार आहे. या व्यक्तींना केंद्र शासनाचे आरोग्य सेतू मोबाईल अँप डाउनलोड करून घेण्याबाबत सांगण्यात येईल, ज्यामुळे या लोकांचा फॉलोउप ठेवणे सोईचे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *