महाराष्ट्र दिन : शाहिरांचा बुलंद आवाज, कोल्हापूरने दिला अभ्यासाचा साज…!

कोल्हापूर मनोरंजन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थाने खमका आवाज दिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील शाहिरांनी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख असोत शाहीर आत्माराम पाटील असोत किंवा कोल्हापूरचे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर अशा कैक शाहिरांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, या शाहिरांच्या पोवाड्यांचा विविधांगी अभ्यास केला तो येथील सध्याच्या शाहिरांनी. विविध पोवाड्यांचा केवळ संगीतात्मकच नव्हे तर रूपकात्मक अर्थही समजून सांगण्यात इथल्या शाहिरांनी पुढाकार घेतला आणि या नसांनसांत रोमांच उभे करणाऱ्या या पोवाड्यांतील विविध पैलू सर्वांसमोर आणले. हिरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आता नव्या पिढीसाठी हा अभ्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

– मैनेची पर्वा

नाही कुणा राहिली…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आजही साऱ्यांनाच तितकीच अंतर्मुख करणारी ‘माझी मैना गावावर राहिली’ ही छक्कड. वरवर पहाता ही एक प्रेमकथा वाटत असली तरी ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि तत्कालीन एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना ती मराठी माणसांची तळमळ अधोरेखित करते. अर्थात त्यासाठी मैनेचे रूपक अण्णाभाऊंनी वापरले होते. मात्र, नंतरच्या काळात ती केवळ मनोरंजनासाठीची एक प्रेमकथा असल्याचा समज वाढू लागला आणि अशा काळात या रचनेचा खरा अर्थ समजून सांगण्याची वेळ आल्यानंतर ही रचना समजून सांगण्यासाठी शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी त्यावर आधारित दुसरी रचना लिहिली आणि ती सर्वांसमोर आणली. आजही त्यांची ही “माझी मैना गावावर राहिली. तिची पर्वा कुणा नाही राहिली’ ही रचना सर्वत्र नव्या पिढीसाठी हमखास सादर होते.

महाराष्ट्र चळवळीचा…

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर आत्माराम पाटील यांचा “संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा…’ हा गोंधळ प्रचंड गाजला. अनेक दीर्घ पोवाडेही त्यांनी लिहिले. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या या शाहिरीचा तौलनिक अभ्यास संशोधनातून पहिल्यांदा पुढे आणला तो शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी. शाहीरी पोवाडा या पारंपरिक बाजाला कुठेही धक्का न लावता आत्माराम पाटील यांनी नवीन पोवाड्याचा बाज निर्माण केला. स्वतःची स्वतंत्र शैली, भूमिका घेवून त्यांनी शाहिरी केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही आणि फारसे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांच्या रचना आणि सादरीकरणात शास्त्रीय संगीताचा कसा प्रभावी वापर झाला आहे, अशा विविध अंगांनी डॉ. नायकवडी यांनी हा अभ्यास मांडला आहे.

आजरेकर एकवटले

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचे मुळगाव आजरा तालुक्‍यातील महागोंड. राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषयात 1935 साली ते पदवीधर झालेले. नोकरीनिमित्त हे मुंबईला गेले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या एकूणच कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने समस्त आजरेकर एकवटले असून प्रत्येक वर्षी गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *